ठाण्यात समूह विकासाचे वारे वाहू लागताच धडधाकट इमारतीही धोकादायक ठरविण्याचे ‘प्रताप’ उघडकीस येऊ लागले असून वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील ४४ क्रमांकाची इमारत अशाच प्रकारे धोकादायक ठरविण्याचा डाव रचला जात असल्याचा धक्कादायक आरोप स्थायी समिती सभेत काही सदस्यांनी केल्याने महापालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या संगनमताने सुरू असलेली नवी बनवेगिरी चव्हाटय़ावर आली आहे. राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेने संयुक्तपणे आखलेल्या समूह विकास योजनेच्या आड एखादी अधिकृत इमारत येत असेल तर ती ‘विकत’ घेण्याचे अधिकारी आयुक्तांना असणार आहेत. या नव्या धोरणामुळे ठाण्यातील अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या पोटात आधीच गोळा आला असताना आता धडधाकट इमारतीही धोकादायक ठरविण्याचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. वर्तकनगर भागातील म्हाडा वसाहतीमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी इच्छुक असलेल्या एका राजकीय नेत्याने काही धडधाकट इमारती धोकादायक ठरविण्याचे षड्यंत्र आखल्याची चर्चा असून स्थायी समिती सभेत या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाल्याने महापालिका प्रशासनही पेचात सापडले आहे.
ठाणे शहरात येत्या काळात पुनर्विकासाचे मोठे जाळे उभे राहण्याची चिन्हे असून राज्य सरकारने आखलेली समूह विकासाची योजना प्रत्यक्षात अवतरल्यास एक नवे शहर उभे राहील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे महापालिकेने सादर केलेल्या एका अहवालानुसार ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये आतापर्यंत सुमारे १४ कोटी चौरस फूट इतक्या मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकाम उभे राहिले आहे. या बांधकामांचा पुनर्विकास हे समूह विकास योजनेचे मूळ ऊद्दिष्ट असले तरी धोकादायक असलेल्या अधिकृत इमारतींचाही यामध्ये समावेश होणार आहे. समूह विकासात सहभागी होणारी एखादी इमारत अधिकृत असली तर तिचे वयोमान किमान ३० वर्षे इतके असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३० वर्षांनंतर प्रत्येक इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करणे बंधनकारक असून त्या आधारे संबंधित इमारत धोकादायक आहे किंवा नाही हे ठरविले जात आहे. असे असले तरी काही प्रकरणांत संरचनात्मक परीक्षणही पुरेसे नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असून ठाणे महापालिकेकडे इमारत धोकादायक ठरविणारी ठोस यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे चित्र पुढे येत आहे.
राजकीय ‘प्रताप’ आणि प्रशासकीय गौडबंगाल
ठाण्याच्या पश्चिमेकडे म्हाडाच्या मोठय़ा वसाहती असून या वसाहतींमधील अनेक इमारती धोकादायक असल्याचा निष्कर्ष यापूर्वीच काढण्यात आले आहेत. यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास सुरू असला तरी ही प्रक्रियाही अतिशय संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेचे नाव घेऊन काही राजकीय हितसंबंध असलेली मंडळी या इमारतींमध्ये शिरतात आणि बांधकामांची तपासणी करू लागतात, असा खळबळजनक आरोप ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी स्थायी समितीमध्ये केल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडू लागले आहे. वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील ४४ क्रमांकाची इमारत अशाच प्रकारे धोकादायक ठरविण्याचा घाट घातला जात असून ही इमारत धोकादायक आहे हे ठरविण्याचे अधिकार साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला कुणी दिले, असा सवाल जगदाळे यांनी करत प्रशासनाला कोंडीत पकडले. दरम्यान, शहरातील जुन्या इमारतींचे बेकायदेशीरपणे सर्वेक्षण करणाऱ्या घुसखोरांचा शोध घ्या, अशी मागणी या वेळी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. हे घुसखोर कुणाच्या सांगण्यावरून ४४ क्रमांकाच्या इमारतीत शिरले आणि त्यांना बांधकामाची तपासणी करण्यासाठी हातोडे कुणी दिले याचाही शोध घ्या, अशी मागणीही म्हस्के यांनी या वेळी केली. दरम्यान, जगदाळे आणि म्हस्के यांच्या आरोपांवर खुलासा करताना महापालिका प्रशासनाची त्रेधा उडाल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले. चांगल्या स्थितीतील इमारती धोकादायक ठरविण्याचे एक मोठे रॅकेट शहरात काम करू लागले असून समूह विकास योजना पूर्णत्वाने लागू करताना हा धोका वेळीच ओळखायला हवा, असे आवाहन म्हस्के यांनी या वेळी केले.