स्थानिक श्रीमती रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालय तसेच मनोहरभाई पटेल बी.एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व सांस्कृतिक समारंभाचे उद्घाटन करताना महिलांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्याचा व आत्मविश्वासाने समाजकार्य करण्याचा सल्ला राष्ट्रवादी युवती मंचच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दिला. याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी महिलांच्या आत्मविश्वासाशिवाय समाज प्रगत होणे व समाज जागरण होणे अशक्य, असे सांगितले.
 प्रफुल्ल पटेल अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षांबेन पटेल, सचिव आमदार राजेंद्र जैन, हातमाग महामंडळ मुंबईचे अध्यक्ष धनंजय दलाल, नगराध्यक्ष वर्षां धुर्वे, जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, मनोहरभाई पटेल शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता लोही-रोकडे, प्रा. डॉ. कैलास ईश्वरकर, अंकिता भट आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आर.एम. पटेल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जुल्फी शेख यांनी केले. याप्रसंगी मंचावरील सर्व पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धातील विजेत्यांना प्रावीण्याबद्दल बक्षिसे प्रदान करण्यात आलीत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. चंद्रशेखर शर्मा यांनी केले. आभार शिरीष नखाते यांनी मानले.