तालुक्याच्या पूर्व भागातील भोजडे, खोपडी, लौकी, धोत्रे आणि तळेगावमळे हे पाच पाझर तलाव आपत्कालीन परिस्थितीत नांदूर-मध्यमेश्वर जलद कालव्याच्या पाण्यातून भरून द्यावे, अशी मागणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांनी केली आहे.
कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता (वैजापूर), नाशिक व नगरचे जिल्हाधिकारी, तसेच विभागीय आयुक्त यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई हिवाळ्यातच मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. वरील गावांसाठी ७ दशलक्ष घनफू ट पाणी या पाझरतलावांमध्ये जलद कालव्याद्वारे सोडल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. एक्स्प्रेस कालव्यापासून हे पाझर तलाव  अर्धा ते दोन किलोमीटरच्या अंतरावर असून सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. त्याचप्रमाणे पालखेड कालव्यातूनही कोळनदीवरील बंधारे व पाझर तलाव पिण्याचे पाण्याची टंचाई म्हणून तातडींने भरून द्यावेत, अशीही मागणी कोल्हे यांनी पाटबंधारे खात्याकडे केली आहे.