सरकार ऊसदरवाढ प्रश्नी शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा बघत असून, जाणीवपूर्वक नको इतक्या विलंबामुळे ऊस उत्पादकासह साखर उद्योग अडचणीत आल्याचे खापर काँग्रेस आघाडी शासनावर फोडताना, हे सरकार मुर्दाड असल्याने दुखवटा म्हणून उद्या गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून ४८ तास साखर पट्टय़ात बंद पाळावा, मुंबईसह महानगरांकडे जाणारा दूध व भाजीपालाही बंद ठेवावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी केले.
पंतप्रधानांना काल राज्याच्या शिष्टमंडाळातून भेटून आल्यानंतर आज कराड तालुक्यातील पाचवडेश्वर या आंदोलनस्थळी भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह प्रमुख कार्यकत्रे उपस्थित होते. यावेळी शरद पवारांची प्रतिकात्मक तिरडी काढून त्यास फटके देण्याचा प्रकार पोलिसांच्या साक्षीने करण्यात आला.
राजू शेट्टी म्हणाले, की पंतप्रधानांनी ऊसदराच्या निर्णयासाठी तीन दिवसांचा अवधी घेतला होता, त्यातील आजचा एक दिवस संपला असून, दोन दिवस राहत आहेत. या दरम्यान, सर्वसामान्य जनतेनेही शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवावा. पश्चिम महाराष्ट्रातील बंदला पाठिंबा द्यावा. आणि या दोन दिवसात ऊसदराचा निर्णय न झाल्यास ३० नोव्हेंबरला महिला शेतकरी मोर्चाने साखर कारखानदारांना बांगडय़ांचा आहेर देतील. असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनासाठी आम्हाला स्मशानाशेजारी जागा दिली आहे. ऊसदराच्या निर्णयासाठी आत्तापर्यंत पाचवेळा तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणाऱ्यांनी सहकारी साखर कारखानदारी खासगीकरणाच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे साखर उद्योग आता शेतकऱ्यांचा नव्हेतर नेत्यांचा झाला आहे. सद्यपरिस्थितीवरून साखर उद्योग अडचणीत आला असून, याला शेतकऱ्यांचा काय दोष, आम्ही ऊसदर कमी का घ्यायचा? असा प्रश्न करून, आज महिलाही रस्त्यावर आल्या आहेत. याचे भान शासनाने ठेवावे,असा इशारा त्यांनी दिला. दिल्लीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेला आपण आडकाठी आणली नसल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. शरद पवारांकडे काळीज असते तर काल त्यांनी पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकून घ्यायला हवा होता, असे मत व्यक्त करून, पवारांनी विश्वासघात केल्यानेच आज शेतकऱ्याला आक्रोश करावा लागत असल्याची टीका त्यांनी केली.
सदाभाऊ खोत यांनी साखर कारखान्यांमधील २५ किमी अंतराची अट काढा, साखर कारखानदारी खुली होऊ दे, शासनाला ऊसदर मागणार नाही असे आवाहन दिले. प्रशासन व पोलिसांनी आजवर सहकार्य केल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी यापुढेही सहकार्याची भूमिका ठेवावी. काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्याला भिके कंगाल करून, सहकारी कारखाने, बँका आदी संस्था गिळंकृत केल्याचा आरोप केला.