पशूबळी रोखण्यासाठी अंनिसची मोहीम

माघ पौर्णिमेनिमित्त वडांगळी येथे सतीमाता-सामतदादा आणि दोडी बुद्रुक येथे म्हाळोबा या ग्रामदैवतांच्या यात्रेला मंगळवारपासून सुरूवात होत

माघ पौर्णिमेनिमित्त वडांगळी येथे सतीमाता-सामतदादा आणि दोडी बुद्रुक येथे म्हाळोबा या ग्रामदैवतांच्या यात्रेला मंगळवारपासून सुरूवात होत असून या निमित्त राज्यभरातून बंजारा आणि धनगर समाज बांधवांचे सिन्नर येथे आगमन होत आहे. यात्रोत्सवात नवसापोटी हजारो बोकडबळी उघडय़ावर दिले जातात. या प्रथेविरोधात जनजागृती करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती भाविकांचे प्रबोधन करणार आहे. उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी अर्थात उघडय़ावर पशूहत्येवर बंदी घातली आहे. अनिष्ट प्रथांना मुठमाती देऊन सुसंस्कृत समाज घडणीत युवकांनी सहभागी व्हावे असा संदेश अंनिस देणार आहे.
माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी होणाऱ्या यात्रोत्सवात ३ ते ४ लाख भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत असतात. वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत. सलग तीन दिवसाच्या या यात्रोत्सवात बंजाराचा समाजातील सर्व घटक उत्साहाने सहभागी होतात. मंत्री, राजकीय पदाधिकारी. भारतीय प्रशासकीय सेवा व तत्सम दर्जाचे शासकीय अधिकारी आवर्जुन हजेरी लावतात. मुक्कामी राहुन भाविक रात्रभर गाण्यांचा जागर करतात. अखेरच्या दिवशी नवसापोटी बोकड बळी देऊन प्रसाद लाल निशाणात घेऊन भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होतो. दोडी येथे म्हाळोबा ग्रामदैवताच्या यात्रेत धनगर समाज बांधव सहभागी होतात. येथेही नवसपूर्तीनिमित्त बोकड बळी दिला जातो. दोन्ही ठिकाणी बहुतांश भाविक उघडय़ावर पशूबळी देतात. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये उघडय़ावर पशू बळी देण्यास बंदी आहे. तसेच समाजसुधारकांनी नवस करून तो पूर्ण करण्याच्या प्रथेला निषेध केला आहे.
या पाश्र्वभूमीवर अंनिसतर्फे यात्रोत्सवातील अनिष्ट प्रथांविरोधात प्रबोधन व सत्याग्रह केला जातो. यंदाही यात्रेच्या ठिकाणी मंगळवारी अंनिसचे कार्यकर्ते प्रबोधन करणार आहेत.
दैववाद सोडून समाजाने प्रयत्नवादाकडे वळावे यासाठी अविरतपणे प्रयत्न सुरू आहेत. राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार, प्रचार व प्रसर करावा असे कर्तव्य नमूद आहे. पण, अवैज्ञानिक प्रथा-परंपरा जोपासल्या जाताना दिसतात. या अनिष्ट प्रथा सुरू ठेवण्यामागे गरीबाला आणखी गरीबीत ढकलण्याचे कारस्थान असल्याचे समितीचे म्हणणे आहे. देवाच्या नावाखाली आर्थिक शोषण करणे, दंडवत-गळ खेळणे अशा अवैज्ञानिक कृतीतून महिलांच्या आरोग्याशी खेळ करणे अशा अनेक बाबी यात्रोत्सवात बिनदिक्कतपणे चालतात. प्रशासनाने ठरवले तर उघडय़ावरील पशूबळी देण्याची अनिष्ट प्रथा तात्काळ थांबू शकते. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल. भाविकांनी अनिष्ट प्रथांना मुठमाती देऊन त्याऐवजी गरीब कुटुंबांना मदत, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करता येईल. यामुळे नवसापोटी उघडय़ावरील पशूबळी आणि अनिष्ट प्रथा स्वत:हून थांबवाव्यात असे आवाहन अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले आहे. उघडय़ावर बोकड अथवा मेंढरू यांचा जीव घेणे, तिथेच मांस शिजविणे यामुळे सार्वजनिक अस्वच्छता वाढते. पाठिशी हुक टोचून, तोच हुक पुन्हा आलटून पालटून वापरला जातो. त्यासाठी कोणतीही शुध्दीकरणाची प्रक्रिया केली जात नाही. यामुळे धनुर्वात अथवा एड्ससारख्या गंभीर रोगांची लागण होऊ शकते याकडे अंनिस लक्ष वेधणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Campaign by anis to prevent animal prey

ताज्या बातम्या