रुग्णाला कासावीस करणारी श्वसनमार्गाची व्याधी दमा अथवा अस्थमावर प्रभावी उपचार शक्य आहे, याची लोकांना माहिती मिळायला हवी. अस्थमावरील उपचाराची योग्य माहिती मिळाल्यास बहुतांशी रुग्ण अस्थमावर नियंत्रण ठेवू शकतील आणि त्यांना सामान्य जीवन जगता येईल, तसेच अस्थमाचा जीवघेणा झटका आणि रुग्णालयाच्या खर्चापासून दूर राहता येईल. अस्थमावर उपचार शक्य नाही ही मनातील भीती दूर करा आणि अस्थमावर नियंत्रण ठेवून सामान्य जीवन जगा, असा सल्ला शहरातील ज्येष्ठ फुफ्फूस रोगतज्ज्ञ डॉ. राजेश स्वर्णकार यांनी जागतिक अस्थमा दिनाच्या निमित्ताने दिला आहे.
अस्थमा हा श्वासविकाराशी संबंधित असा जुना आजार आहे. यामध्ये फुफ्फुसाच्या श्वासनलिकेला सूज येते, तसेच फुफ्फुसाला काही घटकांमुळे अ‍ॅलर्जी होते. यातूनच अस्थमा विकाराचा जोरदार अटॅक येतो. धुळीचे कण, सर्दी, परागकण हे घटक अस्थमाच्या अटॅकला करणीभूत ठरतात. दाटकेसांचे  पाळीव प्राणी, विषाणू, धुम्रपान वायू प्रदूषण यासोबतच भावनात्मक बदल हे घटकही अस्थमाला कारणीभूत आहेत, असल्याचे डॉ. स्वर्णकार म्हणाले.
जगात ३०० दशलक्ष लोक अस्थमाने ग्रस्त असून  दरवर्षी अडीच लाख लोकांचा मृत्यू या विकारामुळे होतो. दहा वर्षांपर्यंतच्या १० टक्के मुलांना, तर बारावर्षांपर्यंतच्या ८ टक्के मुलांना अस्थमाचा आजार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.