निवडणुका जाहीर झाल्यापासून विदर्भातील १०३८ उमेदवारांमध्ये सुरू असलेली धावपळ बुधवारी सायंकाळी मतदानानंतर थांबली. सर्वच प्रमुख उमेदवारांना विजयाची आशा असली तरी मतदारांचा उत्साह आणि वाढलेली मतदानाची टक्केवारी यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदान यंत्रात काय दडले आहे, हे कळायला दोन दिवसांचा अवधी असल्याने या काळापर्यंत उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे.
विदर्भात विधानसभेच्या ६२ मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान झाले. विदर्भ हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात समीकरणे बदलली. काँग्रेसचे विभाजन होऊन निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस, पारंपरिक दलित मतांचे बसपासह विविध रिपाइं गटात झालेले विभाजन आणि उमेदवारी वाटपातील पक्षाची धोरणे यामुळे विदर्भाचा गड केव्हा ढासळला हे काँग्रेसच्या नेत्यांना कळलेच नाही. गेल्यावेळेस मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर ही समीकरणे आणखी बदलली. या साऱ्या पाश्र्वभूमीवर यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, रिपाइं या प्रमुख पक्षांसह इतरही काही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. आचारसंहितेचा बडगा, निवडणूक निरीक्षकांची करडी नजर या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी गेल्या पंधरा दिवसात प्रचार यंत्रणा राबविली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी सभाही घेतल्या. जाती-पातीच्या राजकारणाची जुळवाजुळव करण्यात आली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांनी त्यांच्या उमेदवारांसाठी जोर लावला. तरुण मतदारांना वळविण्यासाठी प्रयत्नही झाले. या सर्व पाश्र्वभूमीवर विदर्भातील सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या. विशेष म्हणजे यावेळी आघाडी आणि युती दोघांचीही फाटाफूट होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले. विदर्भातील काही जिल्ह्य़ात बहुजन समाज पक्ष निवडणुकीत निर्णायक स्थितीत आला. नागपुरात काँग्रेसचे नितीन राऊत, अनीस अहमद, प्रफुल्ल गुडधे पाटील, सतीश चतुर्वेदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, बल्लारपूरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, वरोरामध्ये माजी मंत्री संजय देवतळे, काटोलमध्ये माजी मंत्री व राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यासह विदर्भात १०३८ उमेदवार रिंगणात होते.  
गेल्यावेळेच्या निवडणुकीपेक्षा मोठय़ा प्रमाणात मतदान झाले. विदर्भातील अनेक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीही अनेकांना धक्का देणारी ठरली. सर्वच प्रमुख उमेदवारांना विजयाची आशा असली तरी मतदान यंत्रात काय दडले आहे हे दोन दिवसांनी म्हणजे १९ ऑक्टोबरला कळणार असल्याने उमेदवारांची धाकधूक आणखीच वाढली आहे. दोन दिवसांचा अवधी असला तरी राजकारणात इतका वेळ क ोणालाच थांबणे शक्य नसल्याने पोलिसांच्या गुप्तचर खात्याचा हवाला देत, तर राजकीय विश्लेषकांचा अंदाज विचारात घेऊन ‘कोण जिंकणार, कोण हरणार’ याबाबत अंदाजही व्यक्त केले जात आहेत.
सर्वच उमेदवार त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांबाबत प्रतिकूल परिस्थितीचे वर्णन करीत आहेत. कुणाला किती मते मिळतील, कुठल्या भागात कोणता उमेदवार चालला, याबाबत कार्यकर्ते चर्चा करीत आहेत.
तर्कवितर्कोचा हा खेळ दोन दिवस चालणार आहे. तोपर्यंत उमेदवारांसह सर्वानाच निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.