शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करत पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थ्यांला १९ लाख रूपयांना गंडा घातल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटकही केली.
जुलै ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत ही घटना घडली. पश्चिम बंगालमधील मालदा येथील खान इस्माईल समा अजिजुल्ला या विद्यार्थ्यांला आडगावच्या ‘मविप्र’ संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा होता. यावेळी संशयितांनी इंटरनेटद्वारे त्याच्याशी संपर्क साधून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. प्रवेशासाठी खानकडून १९ लाख ३९ हजार १०० रूपये घेऊन संशयितांनी त्याला बनावट प्रवेश पत्र आणि शुल्क भरल्याची पावती दिली.
त्या अनुषंगाने खानने महाविद्यालयात चौकशी केली असता उपरोक्त कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात आल्यावर खान आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रिपलभाई गोपालभाई गज्जर या संशयितास अटक करण्यात आली. उर्वरित संशयित फरार झाले आहेत.