दामदुप्पटचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या भामटय़ांविरोधातील तक्रारीची दखल घेण्याऐवजी उलट त्या भामटय़ांना मदत करण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. डी. मोरे यांच्यासह दोन जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे येथील नौपाडा परिसरात राहणारे राजेश दत्तू काकड (३७) हे व्यवसायाने वकील असून त्यांनी पाचपाखाडी भागात राहणाऱ्या राजेश जैस्वाल, विनोद जैस्वाल आणि मनीष जैस्वाल या बंधूंना पैशांची मदत केली होती. दरम्यान, हे पैसे परत करण्यासाठी जैस्वाल बंधूंनी त्यांना धनादेश दिले होते. मात्र ते बँकेत वटलेच नव्हते. असे असतानाच दामदुप्पटचे आमिष दाखवून जैस्वाल बंधूंनी गंडा घातल्याचे तक्रार अर्ज अनेकांनी नौपाडा पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली होती. या दोन्ही प्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रार अर्जावर कारवाई करण्याऐवजी त्या भामटय़ांना वाचविण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केले. खोटय़ा जावक क्रमांकाने बनावट दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे भासविले होते. तसेच या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नव्हती. याप्रकरणी राजेश काकडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने सह पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यामध्ये बनावट दस्तऐवज तयार करून आरोपींना मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र तत्कालीन सह पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी चौकशीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. डी. मोरे यांच्यासह साहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ रघुनाथ सोनावणे आणि पोलीस नाईक नीलेश गुलाब किसवे यांना समज देऊन सोडले होते. त्यामुळे राजेश काकडे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी ठाणे न्यायालयात दावा दाखल केला. या प्रकरणाची कागदपत्रे न्यायालयात सादर केली असता, न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.