तुळजापूर रस्त्यावर उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथे सहकारी पतसंस्था फोडून चोरटय़ांनी १८ तोळे सोने व रोख रक्कम असा मिळून दोन लाख ७५ हजारांचा ऐवज लांबविला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
उळे येथे संत कृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कार्यरत आहे. पतसंस्थेच्या बंद कार्यालयाचे शटर उचकटून चोरटय़ांनी पतसंस्थेत प्रवेश केला. तेथील लोखंडी लॉकर फोडून चोरटय़ांनी १८ तोळे सोने व ३४९२ रुपये एवढी रोकड असा ऐवज चोरून नेला. सकाळी पतसंस्था फोडण्यात आल्याचे उघडकीस आले तेव्हा तातडीने पोलिसांकडे धाव घेण्यात आली. पतसंस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत बब्रुवान जाधव यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
तुळजापूर रस्त्यावर सिध्दिविनायक नगरात राहणारे सुरेश शिंगडगावकर यांची घरफोडी होऊन चोरटय़ांनी तीन लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला. शिंगडगावकर कुटुंबीय आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी परगावी गेले असताना चोरटय़ांनी संधी साधून त्यांचे घर फोडले. यात सोन्याचे दागिने, लॅपटॉप, रोख रक्कम, एलसीडी टीव्ही आदी ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला.