अंनिसच्या जात पंचायत विरोधी लढय़ाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

‘ऑनर किलिंग’च्या घटनांमागे जात अथवा जात पंचायत असल्याचे लक्षात घेत अमेरिकेतील एका लघुपट निर्मात्याने थेट नाशिकला धाव घेऊन जात पंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात एल्गार

‘ऑनर किलिंग’च्या घटनांमागे जात अथवा जात पंचायत असल्याचे लक्षात घेत अमेरिकेतील एका लघुपट निर्मात्याने थेट नाशिकला धाव घेऊन जात पंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात एल्गार पुकारणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. जात पंचायतीच्या कारभाराने होरपळून निघालेल्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांच्या अनुभवांचे पथकाने चित्रीकरण केले. बहिष्कृत कुटुंबांना समाजात पुन्हा स्थान मिळवून देणाऱ्या अंनिसच्या लढय़ाची दखल यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.
तालिबानी पद्धतीने निर्णय घेणाऱ्या जात पंचायतीच्या कारभाराविरोधात अंनिसने जात पंचायत मूठमाती अभियान छेडले होते. या माध्यमातून ठिकठिकाणी परिषदांचे आयोजन झाल्यामुळे अनेक जात पंचायती बरखास्त करण्यात आल्या. पंचायतीच्या तोंडी फतव्यांमुळे अनेक कुटुंबीयांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याची बाब अंनिसने पुढे आणली. जात पंचायतीचा कोणत्याही निर्णयात इतका हस्तक्षेप होता की, समाजातील एखाद्या कुटुंबातील लग्न कुठे होईल, लग्नात कोण उपस्थित राहील, हेदेखील ही पंचायत ठरवत असे. समाजातील कोणी आंतरजातीय विवाह केल्यास संपूर्ण कुटुंबीयास बहिष्कृत करण्याच्या निर्णयाचे चटके अनेक कुटुंबीयांना सहन करावे लागले. अंनिसच्या अभियानामुळे मुंबईची वैदू, नाशिकची भटके जोशी, माळेगाव (नांदेड) आणि मढी (अहमदनगर) येथील यात्रेतील अनेक जात पंचायती बंद करण्यात आल्या, तर काहींनी जात पंचायतीचे रूपांतर सामाजिक सुधारणा मंडळात केले आहे. यामुळे बहिष्कृत कुटुंबांना सन्मानाने परत समाजात स्थान मिळाले. या घडामोडींची माहिती ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ आणि मुंबईतील काही कलाकार मंडळींकडून अमेरिकेतील लघुपट निर्माते पॉवेल गिला यांच्यापर्यंत पोहोचली. पॉवेल हे ऑनर किलिंगच्या विषयावर ‘इन द नेम ऑफ ऑनर’ या लघुपटाची निर्मिती करत आहेत.
ऑनर किलिंगच्या काही घटनांचे चित्रण त्यांनी अफगाणिस्तान, सीरिया, जॉर्डन, पॅलेस्टाइन येथे जाऊन केले आहे.
‘ऑनर किलिंग’च्या घटनांशी जात व जात पंचायतीचा संबंध निदर्शनास आल्यावर पॉवेल यांनी अंनिसशी संपर्क  साधला.कार्यकर्त्यांनी त्यांना जात पंचायतीच्या अन्यायी न्याय निवाडय़ाची तसेच शिक्षेची माहिती दिली. जात पंचायतीची दाहकता ऐकून त्यांना धक्का बसला. त्यानंतर ते पथकासमवेत नाशिकला आले आणि जात पंचायतीच्या दबावामुळे आंतरजातीय विवाह केलेल्या स्वत:च्या मुलीचा जीव गेलेल्या कुंभारकर कुटुंबाची निवड केली. अंनिसच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी कुंभारकर परिवाराच्या अनुभवांचे चित्रीकरण केले. जात पंचायतीच्या अमानुष शिक्षा ऐकून पॉवेल सुन्न झाले. त्यांनी अंनिसच्या लढय़ाचे कौतुक केले. पुढील चित्रीकरणासाठी ते पाकिस्तानला रवाना झाले. अंनिसच्या लढय़ाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्यामुळे मोहिमेला बळ मिळाल्याची भावना अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली. या वेळी अंनिसचे महेंद्र दातरंगे, सुबोध मोहिते, युवराज बावा, मंगला गोसावी, कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत कावळे, अण्णा हिंगमिरे, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cast panchayat fight news