scorecardresearch

जिल्हा परिषदेच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये उत्साह

जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील चारही पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसची राजकीय पत वाढल्याने आता संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्यास चालना मिळाली आहे.

जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील चारही पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसची राजकीय पत वाढल्याने आता संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्यास चालना मिळाली आहे. काँग्रेसची अवस्था जिल्ह्यात गलितगात्र झाली होती. या निवडणुकीने लयास जाणाऱ्या पक्षात नव्याने उत्साह संचारल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या वरिष्ठांनी प्रतिष्ठेची केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेत दमदार अस्तित्व दाखवा असा अलिखित आदेश त्यांच्याकडून निघाल्याने काँग्रेसची मातब्बर मंडळी लगबगीने कामाला लागली. यामुळे पक्षाला लाभ झाला. केवळ एकाच तालुक्यात नाही तर धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री या चारही ठिकाणी काँग्रेसने आपल्या जागा वाढविल्याचे अधोरेखीत झाले आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, धुळे पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात दिल्यानंतर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असा सर्वसाधारण अर्थ यंदाच्या जाहीर झालेल्या निकालावरून काढला जात आहे. परंतु, ज्यांनी गेली अनेक वर्षे सत्ता भोगुनही खूप काही विकास केला नाही, त्या पक्षालाही केवळ नाराजीतूनच मतदारांनी पाच वर्षे दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच मतदारांनी पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्याने पुढे काँग्रेसची सत्ता कशी कायम ठेवता येईल यासाठी काँग्रेसजनांना सर्व काही सबुरीने घ्यावे लागणार आहे.
जिल्ह्यातील धुळे आणि शिरपूर हे दोन तालुके आणि तेथील काँग्रेसचे नेते म्हणजे माजीमंत्री रोहिदास पाटील व आमदार अमरीश पटेल या दोघांवरच काँग्रेसची मदार असल्याचे अनेकवेळा सिध्द झाले आहे. त्यातील धुळे तालुक्यात काँग्रेसची अवस्था कशी राहील याबद्दल नेहमीच साशंकता व्यक्त केली जाते. पण, शिरपूर तालुक्यात मात्र काँग्रेसश्रेष्ठी निर्धास्त राहिले. आ. पटेल यांच्या नेतृत्वाखाली दिल्या जाणाऱ्या उमेदवारांसमोर विरोधी गटाचे उमेदवार किती आणि कसे तग धरतील याचा विचार केला जातो. यामुळे केवळ एकतर्फी निकाल लागू नये अथवा विरोधी पक्षाचेही तालुक्यात अस्तित्व आहे हे दर्शविण्यासाठीच अन्य पक्षांतर्फे शिरपूर तालुक्यात उमेदवार दिले जातात, अशी परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर, धुळे जिल्हा परिषदेत यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशावर पुढे साक्री व शिंदखेडा तालुक्याची रुपरेषा ठरविणे शक्य होईल.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त ( Nasik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या