मध्य रेल्वे मार्गावर दिवा-मुंब्रा दरम्यान रेल्वे रुळाला गेलेल्या तडय़ामुळे सलग दुसऱ्या दिवशीही उपनगरीय रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तुटक्या रेल्वे रुळांमुळे दिवा आणि पल्याडच्या डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या स्थानकांना मोठे हाल सहन करावे लागले. त्यामुळे उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक साफ कोलमडले. रेल्वे स्थानके तसेच पुलांवरील प्रवाशांच्या गर्दीमुळे अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली. दुपारी दीडपर्यंत ही परिस्थिती कायम होती. त्यामुळे ऐन गौरी पूजनाच्या दिवशी प्रवाशांचा खोळंबा झाला.
विक्रोळी येथे मंगळवारी निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या हालातून कुठे सावरत नाही, तोच पुन्हा बुधवारीही ‘रोज मरे..’च्या अनुभवास त्यांना सामोरे जावे लागले. या प्रकारामुळे धिम्या मार्गावरील सर्व लोकल वाहतूक खोळंबून पडली. त्याचा फटका जलद मार्गालाही सहन करावा लागला. धिम्या मार्गावरील वाहतुकीमुळे डोंबिवली-कल्याणसह अंबरनाथ, बदलापूर स्थानकांमध्ये गर्दीने उच्चांक गाठला होता. अरुंद पुलावर यामुळे कोंडी निर्माण झाली होती तर फलाटांवर गर्दी उसळली होती. पुढील सर्व स्थानकांवर ही गर्दी कायम होती. डोंबिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक सहा आणि चारवर गर्दी ओसंडून वाहत होती तर कल्याण स्थानकातील मोठय़ा पादचारी पुलासह इतरही दोन पुलांवर गर्दीची कोंडी निर्माण झाली होती.
देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष..
रेल्वेच्या वतीने देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक तर कधी पॉवर ब्लॉक घेऊन पूर्ण वाहतूक बंद करून देखभाल दुरुस्तीच्या कामाचे चित्र निर्माण केले जात असले तरी ही कामे दर्जेदार पद्धतीने होत नसल्याने हे प्रकार वारंवार आणि दररोज घडत आहेत. ओव्हरहेड वायर तुटणे, रुळांना तडे जाणे, सिग्नल यंत्रणा कोलमडणे, पेंन्टाग्राफ तुटणे अशा समस्या निर्माण होतात. चांगल्या दर्जाच्या साधनांचा वापर करून रेल्वेने यावर कायमचा उपाय शोधण्याची गरज आहे. अन्यथा प्रवाशांना आंदोलन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनेचे जितेंद्र विशे यांनी व्यक्त केली.