मध्य रेल्वेवर महिला डब्यांमधील सीसीटीव्हीसाठी नकारघंटाच

चर्नीरोड विनयभंग प्रकरणातील आरोपीचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावणारे सीसीटीव्ही कॅमेरे लोकल गाडय़ांमधील महिलांच्या डब्यांत लावण्याबाबत अद्यापही प्रगती झालेली नाही.

चर्नीरोड विनयभंग प्रकरणातील आरोपीचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावणारे सीसीटीव्ही कॅमेरे लोकल गाडय़ांमधील महिलांच्या डब्यांत लावण्याबाबत अद्यापही प्रगती झालेली नाही. याबाबत पश्चिम रेल्वेने पुढाकार घेत एका गाडीच्या महिलांच्या डब्यात प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. मात्र मध्य रेल्वेवर त्या दृष्टीने नकारघंटाच वाजत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे हे सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही असलेली एक गाडी पश्चिम रेल्वेने मे २०१५मध्ये सेवेत आणली होती. आगामी काळात पश्चिम रेल्वेच्या आणखी तीन गाडय़ांमध्ये सहा ते आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यापैकी दोन गाडय़ा येत्या दोन महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत येतील. महिला प्रवाशांच्या संदर्भात पश्चिम रेल्वेने यापूर्वीच योजना आखल्या असून त्या आता अमलात आणल्या जात आहेत.
महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पश्चिम रेल्वे तत्पर असली, तरी मध्य रेल्वेवर मात्र याबाबत थंडा प्रतिसाद असल्याचे लक्षात येते. मध्य रेल्वेमार्गावर दर दिवशी तब्बल ४० लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेवर एकूण १२५ ते १३० गाडय़ांचा ताफा आहे. मात्र यापैकी एकाही गाडीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची योजनाही मध्य रेल्वेकडे नाही. चर्नीरोड विनयभंगप्रकरणी आरोपी शोधण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उपयुक्तता लक्षात घेतल्यास महिला सुरक्षेसाठी तो उत्तम उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीचे माजी सदस्य राजीव सिंघल यांनीही महिला सुरक्षेसाठी ही मागणी केली आहे.
मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ही अत्यंत खर्चीक बाब आहे. एका लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी दीड लाख रुपयांचा खर्च येतो. ही संपूर्ण योजना ३० कोटी रुपयांची आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने बराच निधी खर्च केल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तरतूद नसल्याचे बोलले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Central railway not yet fit cctv in ladies coach