मोदींच्या सुनामीत सर्व गोष्टींनी संपन्न सागर मेघे धराशायी झाले, तर अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानापर्यंत डमी म्हटले गेलेले भाजपचे रामदास तडस विक्रमी विजयासह दिल्लीकडे झेपावले. जात, धर्म, पंथ, भाषा वगैरे सर्व भेद बाजूला पडले. सव्वा दोन लाखाचे मताधिक्य घेणाऱ्या तडसांनाही हा विजय धक्का देणाराच ठरला, तर दत्ता मेघे व सागर मेघेंच्या राजकारणातील अस्तित्वालाच ते आव्हान देऊन गेले आहे. पुढे काय, हा प्रश्नच मेघे कुटुंबापुढे उभा ठाकला आहो.  
हा विजय मोदी लाटेला श्रेय देणारा असला तरी भाजप कार्यकर्त्यांनी दोन वर्षांंपासूनच परिश्रम केले. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपने लक्षणीय यश प्राप्त केले होते. ठराविक कुटुंबाभोवतीच फि रणारे कॉंग्रेसी कंटाळून भाजपकडे सरकू लागले होते. त्यावर कडी केली ती कांॅग्रेसच्या दहा वर्षांतील निष्क्रिय कारभाराने. सत्ताधाऱ्यांचे अनेक निर्णय सामान्यांसाठी मनस्ताप देणारे ठरले.कांॅग्रेसला दलित-मुस्लिम या घटकांव्यतिरिक्त समाजात कुणीच दिसत नाही का, हा प्रश्नही दबक्या आवाजात व्यक्त केला गेला. मात्र, या सवार्ंवर मेघेंचे निवडणूक व्यवस्थापन कौशल्य मात करेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाई. पैसा, मनुष्यबळ व साधनसामुग्रीत कुठेही कमतरता नव्हती आणि दत्ता मेघेंपेक्षा सागर मेघे हा चेहरा लोक स्वीकारतील, अशीही खात्री देणारेही सपशेल चुकले. मित्रपक्ष राष्ट्रवादी नावापुरतीच सोबत होती. थेटे पंचायत पुढाऱ्यापर्यंत प्रचारासाठी पैसा मिळूनही ते शांत बसले. जे काही प्रचारात उतरले त्यांना लोक  पॅकेजवाले म्हणून हिणवू लागल्याने त्यांची कोंडीच झाली. मेघेंचे धन मातीमोल झाले. सागर मेघेंना स्वनिर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले नाही. दोन लाखांनी पराभूत होण्यात या कारणांचाही मोठा वाटाला राहिला.
डमी म्हटल्या गेलेल्या रामदास तडसांना विजय हवा की नाही, असेच सर्वत्र चित्र होते. ते एकीकडे, तर पक्ष संघटना दुसरीकडे, असा वितंडवाद होता. बुथ नाही, सभा नाही, पक्षनेत्यांना तडसांमध्ये स्वारस्य नाही, पैशाबाबत आखडता हात, कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये दैनंदिन वाद, अशी स्पष्ट लक्षणे महिनाभर दिसत होती.
तडस यांना मेघेंना गुरुदक्षिणा द्यायची म्हणून हे असे चालल्याचे सामान्यही बोलत. मात्र, यावेळी कॉंग्रेसला झटका द्यायचाच, अशा मतदारांनी मेघेंची सकारात्मक साद व तडसांचा नकारात्मक वावर, दोन्ही नाकारला. आर्वीत एकदाही न फि रकणाऱ्या तडसांना याच शहराने भरभरून मते दिली ती मोदी लाटेने, असे म्हणावे लागेल.
कुणबी-तेलीचा प्रखर वाद असूनही गावागावातील कुणबी-पाटलांनी तेली समाजाचा नेता म्हणून तडसांच्या झोळीत भरभरून कमळे ओतली. मेघेंना कुणबी नेते चालतच नाही, हाही प्रचार कामी आला. मेघेंविरोधात जाणाऱ्या अशा सर्व बाबींना मोदी सुनामीने एकत्र केल्या. खासदार नव्हे, तर मला आमदारकीच झेपते, असे म्हणणाऱ्या तडसांना मतदारांनीच खासदारकीचा मुकुट चढविला.