राज्य शासनाच्या दारूबंदीच्या निर्णयानंतर दारूविक्रेत्यांनी बंदीसाठी मनाची तयारी केली असून तब्बल २५ दारूविक्रेत्यांनी परवाना स्थलांतरणासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे रीतसर अर्ज केले आहेत. यात ७ देशी-विदेशी दारूविक्रेत्यांचा समावेश आहे.
श्रमिक एल्गारचे आंदोलन व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहामुळे राज्य शासनाने २० जानेवारीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. यातील देशी दारूचे चिल्लर विक्रेते व देशी-विदेशी दारू परवानाधारकांना चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे तीन जिल्हे वगळून अन्य कोणत्याही जिल्ह्यात परवाना स्थलांतरणासाठी शासनाने परवानगी दिली आहे. नेमका याचाच आधार घेत जिल्ह्यातील दारूविक्रेत्यांनी आतापासूनच परवाना स्थलांतरणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्याकडे अर्ज करणे सुरू केले आहे. या जिल्ह्यात देशी-विदेशी दारू अर्थात, एफएल-२ चे २४ तर चिल्लर देशी दारू सीएल-३ चे १०६ परवानाधारक आहेत. यातील २५ परवानाधारकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केले आहेत. देशी-विदेशी दारू परवानाधारकांमध्ये दानव वाईन शॉप, चंद्रपूर, बल्लारपुरातील राजेंद्र टिकाराम जयस्वाल यांचे राजेंद्र वाईन शॉप, ब्रह्मपुरी येथील माया विजय जयस्वाल यांचे विजय वाईन शॉप, बल्लारपुरातील प्रदीप प्रभाकर भास्करवार यांचे प्रदीप वाईन शॉप, राजुराचे राजेश जयस्वाल व एस.आर.पत्तीवार यांचे पत्तीवार वाईन शॉप, चंद्रपूर येथील मधुकर बालाजी पोरेड्डीवार यांचे श्री ट्रेडिंग कंपनी व तुकूम येथील गुरूजितसिंग लाजेंद्रसिंग गडोख यांचे मॉर्डन वाईन शॉप, या सात दुकानांचा, तर सीएल-३ चिल्लर देशी दारू परवानाधारकांमध्ये पाथरी येथील दीनदयाल सुखलाल जयस्वाल यांचे जयस्वाल ब्रदर्स देशी दारू दुकान, गडचांदूरचे विजय गणेशलाल जयस्वाल यांचे बी.बी.अ‍ॅन्ड व्ही.बि. जयस्वाल देशी दारू दुकान, मूलचे सचिन विनोद जयस्वाल दारू दुकान, आशा अरविंद जयस्वाल देशी दारू दुकान, राजगड, संजय गणपत डुरमुरे यांचे तोहगांव येथील झुरमुरे कंट्री लिकर्स, संतोष विवेक आईंचवार यांचे विस्तारी विठोबा कोडमलवार देशी दारू दुकान, धाबा, चंद्रपुरातील राजेंद्र सुधाकर रामगीरवार यांचे रामगीरवार कंट्री लिकर्स, देवानंद मोतीराम महाजन देशी दारू दुकान, जळका, ब्रम्हपुरीचे किशोर यादवराव रत्नपारखी देशी दारू दुकान, नांदा फाटा येथील मनोज नारायण वडस्कर यांचे बी.एन.एम. देशी दारू दुकान, सिंदेवाहीत कुसूम धनपाल चहांदे यांचे मे.के.सी.एन.व्ही.एस. चहांदे देशी दारू दुकान, शांतादेवी लक्ष्मीनारायण जयस्वाल देशी दुकान, गडचांदूरचे मनोहर पुंडलिक रणदिवे यांचे रणदिवे देशी दारू दुकान, नांदा फाटा येथे वर्षां प्रदिप उत्तरवार यांचे एम.एस. उत्तरवार कंट्री लिकर्स, राजुरात प्रदीप जयचंदलाल जयस्वाल, खडसंगीत वंदना प्रेमदास मानकर यांचे मानकर देशी दारू दुकान, सावलीत दिनकर शेंडे यांचे पी.ए.अ‍ॅन्ड व्ही.एस.शेंडे देशी दारू दुकान, अशा एकूण १८ चिल्लर देशी दुकानांचा समावेश आहे.
जिल्ह्यात चिल्लर देशी-विदेशी दारूची एकूण १३० दुकाने असून यातील २५ परवानाधारकांनी स्थलांतरणासाठी रीतसर अर्ज सादर केलेला आहे. २५ परवानाधारकांचे स्थलांतरणासाठी अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. दरम्यान, ही २५ दुकाने कोणत्या जिल्ह्यात स्थलांतरित केली जावी, याचा उल्लेख परवानाधारकांनी अर्जात केलेला नाही, हे विशेष.
रत्नागिरीची दुकाने अन्यत्र स्थलांतरित
या जिल्ह्यतील तीन मद्यविक्रेत्यांनी रत्नागिरीतील पाच व गोंदियातील एक चिल्लर देशी दारूचे परवाने चंद्रपूर जिल्ह्य़ात स्थलांतरणासाठी प्रयत्न चालविले होते. यातील एक दुकान चंद्रपूर, रामनगर, बह्मपुरी, सावली व गोंडपिंपरी या तीन तालुक्यात लागणार होते. ग्राम पंचायतींनी तसा ठरावही घेतला होता. मात्र, हे सर्व परवाने अन्यत्र स्थलांतरणासाठी अर्ज सादर केले आहेत. यातील बहुतांश परवाने वणी येथे स्थलांतरित होणार आहेत, तर गोंदिया येथील प्रदीप रामदेव जयस्वाल यांनी चंद्रपुरात दारू दुकान सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यांनीही स्थलांतरणासाठी अर्ज सादर केला आहे.