कोटय़वधीचे वार्षकि उत्पन्न असलेल्या तुळजापूर देवस्थानच्या ठिकाणी भाविकांसाठी असलेले चप्पलस्टँड सशुल्क करण्याचा ठराव मंदिर संस्थानने घेतला आहे. भाविकांना या निर्णयाची आर्थिक झळ बसणार आहे.
राज्यातील अग्रेसर देवस्थानांपकी असलेल्या तुळजाभवानी माता मंदिरात १०० वर्षांहून अधिक काळ मंदिर संस्थानमार्फत भाविकांच्या सेवेत चप्पलस्टँड चालविण्यात येते. मागील २५ वर्षांपर्यंत भाविकांची संख्या मर्यादित असताना ही सेवा उपलब्ध होती. सध्या मंदिर कार्यालयाच्या जागेत १९८४पासून चप्पलस्टँडची सुविधा होती. पुढे कल्लोळतीर्थ पूर्वेस तीनमजली इमारतीच्या तळमजल्यात हे स्टँड सुरू होते. तेथेही १० ते १५ वष्रे ही सेवा भाविकांना मोफत दिली जात होती. भाविक इच्छेनुसार तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे देत असत. मात्र, त्यावरून कर्मचारी व प्रशासनात सतत तणावाचे प्रसंग उद्भवत.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात बाळासाहेब िशदे यांच्या दुकानाच्या बाजूस मंदिर संस्थानचे चप्पलस्टँड सुरू झाले. त्यानंतर फलकावर प्रत्येक भाविकासाठी एक रुपया कर आकारण्याचे नमूद केले. परंतु अधिक पसे घेतले जाऊ लागल्याने तत्कालीन ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारून डॉ. गेडाम यांनी चप्पलस्टँड पुन्हा मंदिर संस्थानकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पादत्राणे ठेवण्याची सुविधा सुरू आहे. इच्छेनुसार भाविक दानपेटीत पसे टाकतात. सर्वाच्या सोयीची असलेली ही पद्धत मंदिर संस्थानने मात्र अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर नगरपालिकेने चप्पलस्टँडचा १५ लाखांत जाहीर लिलाव केल्याने भाविकांना पुन्हा सक्तीने पसे देऊन चप्पला ठेवाव्या लागणार आहेत.