सोलापूर जिल्हय़ात बलात्काराचे दोन प्रकार घडले असून, यापैकी एका प्रकरणात शाळेचा मुख्याध्यापक अडकला, तर दुसऱ्या प्रकरणात कायद्याच्या रक्षकाची जबाबदारी असलेल्या फौजदाराविरुद्ध न्यायालयाने आरोप निश्चित केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मुख्याध्यापकाकडून शाळेतील महिला शिपायावर बलात्कार झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे घडला. करकंब पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे. भारत गेना राजगुरू असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. करकंब येथे दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदावर असलेले राजगुरू यांच्याविरोधात याच प्रशालेतील एका ३६ वर्षांच्या महिला शिपायाने तक्रार केली होती. पोलिसात दाखल फिर्यादीनुसार सदर महिला शिपाई विधवा असून तिला शाळेत शिपाईपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुख्याध्यापक राजगुरू यांनी यापूर्वी २००९ साली पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, तिला शाळेत नोकरी मिळाली. त्यानंतर त्याने तिच्यावर पुन्हा दुसऱ्यांदा बलात्कार केला. पीडित महिलेने नोकरीमुळे सर्व काही सहन केले. परंतु त्याच वेळी मुख्याध्यापक राजगुरू यांनी पुन:पुन्हा शरीरसंबंधाची मागणी केल्याने तिने नकार दिला. तेव्हा मीच तुला नोकरीला लावले आहे, तू जर नकार दिला तर पुन्हा मीच नोकरीवरून कमी करीन, अशी धमकी राजगुरू यांनी दिली. त्यामुळे हा प्रकार असहय़ झाल्यामुळे अखेर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली.
बलात्काराचा दुसरा प्रकार सोलापूर शहरात पोलीस कोठडीत एका फौजदारानेच केल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी न्यायालयाने त्याच्याविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्याच्यावर हे आरोप येत्या सोमवारी, १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात येणार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक उत्तम जाधव असे त्याचे नाव आहे. जाधव हे सध्या शहर वाहतूक शाखेत नेमणुकीस आहेत. यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना एका गुन्हय़ात अटक झालेल्या एका महिलेला तपासासाठी फौजदार जाधव यांनी न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळविली होती. २३ ते २७ सप्टेंबर २०११ दरम्यान पोलीस कोठडीत असताना तपासाच्या निमित्ताने फौजदार जाधव यांनी सदर महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार स्वत: त्या महिलेने थेट न्यायालयात केली होती. त्यावर गंभीर दखल घेत न्यायालयाने सदर पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून घेत तिचे व इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविले होते. त्यावरून उपलब्ध पुराव्याच्या आधारे बलात्काराचा प्रकार घडल्याचे दिसून आल्याने न्यायालयाने फौजदार जाधव यांच्याविरुद्ध खटला दाखल करून तो सोलापूर सत्र न्यायालयात वर्ग केला होता. तदर्थ सत्र न्यायाधीश कल्पना होरे यांच्यासमोर हे प्रकरण प्रलंबित असताना पीडित महिलेचे वकील अरविंद अंदोरे व सरकारी वकील माधुरी देशपांडे यांनी न्यायालयात अर्ज सादर करून खटल्याची पाश्र्वभूमी व घटना पाहता फौजदार जाधव यांच्याविरुद्ध सरकारी अधिकाऱ्याच्या बलात्काराचे भारतीय दंड संहिता कलम ३७६ ब हे सौम्य कलम चुकीने लावण्यात आले असून वस्तुत: पोलीस कोठडीतील सरकारी अधिकाऱ्याकडून झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्य़ात कलम ३७६ (२), (अ) हे गंभीर कलम लागू होत असल्याने आरोपात बदल करण्याबाबत म्हणणे मांडले. तथापि, आरोपी जाधव यांचे वकील मिलिंद थोबडे यांनी त्यास आक्षेप घेत साक्षीपुरावा समोर आल्याशिवाय असा कोणताही बदल करता येणार नसल्याचा युक्तिवाद केला. परंतु न्यायालयाने अॅड. अंदोरे व अॅड. देशपांडे यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीविरुद्ध पोलीस कोठडीतील बलात्काराबद्दलचे गंभीर कलम योग्य असल्याचा निर्वाळा दिला. या कलमानुसार आरोपी दोषी आढळल्यास त्याला दहा वर्षे सक्तमजुरी ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.