पिण्याच्या पाण्यामधून होणारे आजार लक्षात घेऊन पाण्यातील स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्याचे अभियान राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. ११ जिल्ह्यांमध्ये तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता नंदुरबारसह उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्य़ात पाच फेब्रुवारी ते सहा मे या कालावधीत या अभियानातंर्गत पेयजलाची रासायनिक तपासणी होणार आहे. नंदुरबार जिल्ह्य़ात आरोग्य विभागाची जिल्हा प्रयोगशाळा सुरू नसल्याने  पेयजल नमूने तपासण्याचे काम धुळे प्रयोगशाळेकडे सोपविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पेयजल स्त्रोतांच्या रासायनिक तपासणी अभियानाच्या नियोजन आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी भागातील गाव, पाडय़ांमध्ये झरे, नाला व नद्यांच्या स्त्रोतांचे काटेकोर परीक्षण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्य़ातील पेयजलाचे स्त्रोत हे डोंगरी पट्टय़ातील असल्यामुळे पेयजल स्त्रोतांच्या रासायनिक तपासणीच्या अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. आरोग्य विभागातील प्रयोगशाळांमध्ये पेयजलातील अनुजैविक घटकांची तपासणी नियमित होत असते.
 पेयजलाच्या स्त्रोतांमध्ये, रासायनिक बाधित स्त्रोतांची संख्या व रासायनिक घटकांचे प्रमाण
वाढलेले आढळून येते. त्याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असतो. मुख्यत्वे करून दुर्गम भागात ही समस्या अधिक जाणवते. पाण्यातील रासायनिक घटकांचे प्रमाण अती झाल्याने विविध आजारांना जनतेला तोंड द्यावे लागते. पाण्यातूनच अनेक आजार निर्माण होत असल्याने पेयजलाची तपासणी आवश्यक झाली आहे.
पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमात रासायनिक घटकांच्या तपासणीचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्वप्रथम राज्यातील ११ जिल्ह्य़ामध्ये एक मार्च ते ३० जून २०१२ या चार महिन्याच्या कालावधीत पेयजल स्त्रोतांच्या रासायनिक तपासणीचे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. उर्वरित २२ जिल्ह्य़ात एक डिसेंबर, २०१२ ते ३१ मार्च २०१३ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात पाच फेब्रुवारीपासून या अभियानास सुरूवात होणार आहे. नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या सहा तालुक्यातील ५०१ ग्रामपंचायत क्षेत्रातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांव्दारे गाव पातळीवरील सहा हजार ५०० पुरवठा स्त्रोतांमधील पाच हजार ९४८ नमुन्यांची तपासणी ६४ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.
या वेळी डॉ. अजय विंचुरकर, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. भगवान पगार, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बी. एस. राठोड, मुख्य जीवशास्त्रज्ञ एल. एम. वाघमारे, जिल्हा पाणी गुणवत्ता
नियंत्रण अधिकारी एकनाथ चौधरी, नितीन पाटील, नंदुरबार व जिल्ह्य़ातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.