सलाम शूरवीरांना
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज (२५ ऑगस्ट) रोजी राष्ट्रपती शौर्यपदक व उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचवणाऱ्या या  अधिकाऱ्यांची शौर्यगाथा ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या शब्दांत..
चेंबूरच्या भतिजा कुटुंबीयांना आपल्यापुढे काय संकट वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही १३ ऑगस्ट २०१० या दिवशी सकाळी आली नव्हती. ज्वेलर्स व बांधकाम व्यावसायिक असलेले विजय भतिजा हे डायमंड गार्डन, चेंबूर येथील ‘कावेरी’ इमारतीत सहाव्या मजल्यावरील सदनिकेत राहत होते. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला टेलिकॉम कंपनीकडून आलो आहोत असे सांगून रवी पुजारी टोळीचा गुंड आनंद डांगळे याने भतिजा यांच्या घरात प्रवेश केला. विजय भतिजा यांच्या घरी घरकाम करणारी मुलगी आणि अन्य चार जणांना त्याने ओलीस ठेवले आणि २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.भतिजा यांनी आपल्या जवळच्या एका नातेवाईकांना दूरध्वनी करून मदतीची मागणी केली. त्या नातेवाईकाने ही बाब स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. बी. राठोड, पोलीस उपनिरीक्षक संजय भापकर यांच्यापर्यंत पोहोचविली. चेंबूर पोलिसांनी तातडीने ‘अ‍ॅटॅक पार्टी’, ‘बॅकअप पार्टी’ आणि ‘कट ऑफ पार्टी’ तयार करून अत्यंत चतुराईने व कमी वेळेत आपली व्यूहरचना केली. त्याच वेळी भतिजा कुटुंबीयांना ‘त्या’ गुंडाबरोबर खंडणीची रक्कम देण्याकरिता बोलणेसुरू ठेवावे, असे सांगण्यात आले.
पिस्तुलाचा धाक दाखवून या गुंडाने मागितलेल्या २५ लाख रुपयांच्या खंडणीच्या धमकीने संपूर्ण भतिजा कुटुंबीय घाबरून गेले होते. पण त्याच वेळी पोलिसांच्या सूचनेनुसार त्यांनी या गुंडाकडे थोडा वेळ मागून घेतला होता. पण या गुंडाच्या तीक्ष्ण नजरेने घराच्या खिडकीतून त्या इमारतीच्या आवारात सुरू झालेली पोलिसांची हालचाल टिपली. मग या गुंडाने पिस्तूल आणि सुऱ्याचा धाक दाखवून ओलीस ठेवलेल्या दोन महिलांसह स्वत:ला शयनगृहात कोंडून घेतले. पोलिसांनी घरात प्रवेश केला तर आपण या दोन्ही महिलांना ठार मारू, अशी धमकी पोलिसांना द्यायला सुरुवात केली.पोलिसांच्या पथकापुढे ओलीस ठेवण्यात आलेल्यांची सुखरूप सुटका करणे आणि त्या गुंडाला पकडणे, असे दुहेरी आव्हान होते. शेवटी शिताफीने पोलीस निरीक्षक बी. बी. राठोड, पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक संजय भापकर यांनी दरवाजा तोडून शयनगृहात प्रवेश केला आणि त्या गुंडाने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी पोलीस निरीक्षक मोरे यांच्या डोक्यापासून केवळ एक इंच अंतरावरून गेली. पण या परिस्थितीतही न डगमगता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

पोलिसांच्या गोळीबारात गुंड आनंद डांगळे याच्या छातीवर गोळ्या लागल्याने तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यापूर्वीच तो मरण पावला होता. पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस निरीक्षक मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक भापकर यांच्या पथकाने सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली आणि सुमारे एक तास सुरू असलेल्या या थरारनाटय़ाची सांगता झाली. विजय भतिजा यांच्या कुटुंबीयांचा १३ ऑगस्ट २०१० या ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असेच म्हणावे लागेल. पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस निरीक्षक मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक भापकर यांच्या पथकाला त्यांच्या शौर्याबद्दल राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे

– डॉ. रश्मी करंदीकर,पोलीस उपायुक्त,ठाणे वाहतूक विभाग