सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच लगबग सुरू होती.. स्वागतासाठी खुद्द जिल्हाधिकारी खाली येऊन थांबलेले.. यामुळे कोणी मंत्री येणार असा सर्वाचा होरा झाला.. तेवढय़ात १० ते १२ वाहनांच्या ताफ्याने कार्यालयात प्रवेश केला.. जिल्हाधिकाऱ्यांनी हसतमुखाने महोदयांचे स्वागत केले.. आणि मग कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकींचे सत्र सुरू झाले.. बैठकींचा विषय नांदगाव, मनमाड व काहीसा येवल्यापुरता सीमित असल्याचे लक्षात आले. नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीने गतकाळातील स्मृतींना उजाळा दिला, तथापि, राज्यात सध्या नेमके कोणाचे शासन आहे, असा प्रश्नही उपस्थित करणारा ठरला. जिल्हा प्रशासनाने एखाद्या माजी मंत्रिमहोदयांची ठेवलेली बडदास्त पाहून सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर, या कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी अवाक् झाले. जिल्हा प्रशासनाबरोबर पोलीस यंत्रणेने आपली सहा ते सात वाहने आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची शक्ती दौऱ्यास लावल्याचे पाहावयास मिळाले. या बैठकीविषयी भाष्य करताना भुजबळ यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपणास प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले.

लोकप्रतिनिधींना अशी बैठक घेता येते काय अगदी इथपासून जिल्हा प्रशासनाने ठेवलेल्या बडदास्तीबद्दल वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले. बैठकीस नांदगावचे आ. पंकज भुजबळ, आ. जयंत जाधव यांच्यासह मनमाड नगरपालिका, महावितरण, पाटबंधारे व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रदीर्घ काळ नाशिकचे पालकमंत्रिपद भूषविणाऱ्या भुजबळ यांच्या बैठकीने गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. या बैठकीचा बाज तसाच असला तरी सत्ताधारी बदलले की, शासकीय अधिकारी कशी टोलवाटोलवीची उत्तरे देतात याची प्रचीती आली. आता नाशिकचे पालकत्व नसले तरी नांदगाव व येवला मतदारसंघाचे पालकत्व भुजबळ कुटुंबीयांकडे असल्याने तेथील रखडलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली. मनमाड शहरातील पाणीपुरवठा योजना, पालखेड डावा कालवा, रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचन व बिगरसिंचन पाणी-वापर, जळलेल्या विद्युत रोहित्रांच्या दुरुस्तीत होणारी दिरंगाई आदींची सद्यस्थिती जाणून घेत रखडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना भुजबळ यांनी केली.
पालखेड डावा कालव्यासाठी सिंचन प्रयोजनार्थ २५४४ दशलक्ष घनफूट पाणी आहे. सिंचनासाठीचे मर्यादित स्वरूपाचे दोन आवर्तन प्रस्तावित असून त्यातील पहिले आवर्तन डिसेंबर २०१४ तर दुसरे आवर्तन फेब्रुवारी २०१५ च्या सुरुवातीस प्रस्तावित करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. मनमाड शहर पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. वाघदर्डी धरणात सध्या ३४ दशलक्ष घनफूट जलसाठा असून ते डिसेंबर २०१४ पर्यंत पुरू शकेल. शहरात सद्यस्थितीत सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. रखडलेल्या कामावरून अधिकाऱ्यांनी परस्परांकडे बोट दाखवून आपली मान सोडवून घेतली.
महावितरणच्या कारभारावरून उपस्थित शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले. नव्याने उभारली जाणारी विद्युत रोहित्र अथवा जळालेली रोहित्र यांची कामे करण्याकडे महावितरणने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून वीज अधिकारी कोणाला जुमानत नसल्याची तक्रार अनेकांनी केली. सर्व तक्रारींची दखल घेत भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या.

विद्युत रोहित्रासाठी पैशांची मागणी
ग्रामीण भागात विद्युत रोहित्र जळाल्यास त्याची दुरुस्ती जाणीवपूर्वक केली जात नाही. या कामासाठी दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केली जाते. त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना वर्गणी काढण्यास सांगितले जाते. वर्गणी काढून ही रक्कम दिली आणि संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली तर आम्ही कोणाकडे दाद मागणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला. मनमाड लगतच्या नागापूर येथे साडे चार वर्षांपूर्वी जळालेले वीज रोहित्र आजतागायत दुरुस्त केले गेले नाही. नवीन रोहित्र बसविण्याच्या कामांची फारशी वेगळी स्थिती नाही. मंजुरी मिळुनही कामे सुरू केली जात नसल्यावरून भुजबळ यांनी कंत्राटदाराला सुनावले.

‘लोकांमध्ये जायला लाज वाटते’
ग्रामीण भागात विद्युत रोहित्र वा त्यासंबंधीत कामे करण्यास महावितरण दिरंगाई करत असल्याने आणि यावरून ग्रामस्थ लोकप्रतिनिधींना जाब विचारत असल्याने लोकांमध्ये जायला लाज वाटते, अशा शब्दात आ. जयंत जाधव यांनी भावना व्यक्त केली. कित्येक महिने वीज कंपनीचे अधिकारी दखल घेत नाहीत. नवीन वीज रोहित्र वा जळालेली वीज रोहित्र कधी दुरुस्त होतील, याची कालमर्यादा महावितरणने स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘शिवसेनेच्या पाहणी दौऱ्याचे स्वागत’
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शिवसेना जिल्हावार पाहणी करून आढावा घेत आहे. ही चांगली बाब असून आपण त्याचे स्वागत करतो, असे आ. छगन भुजबळ यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे व माजी विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. राज्यात ठिकठिकाणी शिवसेना नेते भेट देऊन पाहणी करत आहे. यावर बोलताना भुजबळ यांनी राजकीय पक्षांसाठी ही बाब महत्वाचे असल्याचे सांगितले.