राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी आज सकाळी राजभवन परिसरातील समृद्ध जैवविविध उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. राजभवन परिसरातील वातावरण जैवविविधतेने नटलेले असून निसर्गरम्य आहे. येथे अत्यंत दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावरील पक्षी-वृक्षांच्या प्रजातींचे संगोपन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
मुख्य सचिवांसोबत त्यांच्या पत्नी श्रीमती बांठिया, अप्पर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, डॉ. पी. एस. मीणा, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नागपूरचे विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपालरेड्डी, मुख्य सचिव कार्यालयाच्या उपसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूर  जिल्हाधिकारी सौरभ राव,नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमीत सनी, राजभवनाचे प्रभारी अधिकारी रमेश येवले उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी प्रारंभी बॉटनिकल गार्डनला भेट देऊन गुलाबांच्या झाडांची पाहणी केली. विविध रंगी गुलाबपुष्प पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर हर्बल गार्डनमधील काळमेघ, वेखंड, पाषाणभेद, कस्तुरी भेंडी, सर्पगंधा, लाजाळू, पुदिना, अक्कलकाढा झाडांचे आयुर्वेदात असलेले महत्व उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे यांच्याकडून जाणून घेतले.
निलगिरीच्या झाडांवर बसलेला राज्यपक्षी हरियाल (ग्रीन पीजन) दिसल्याबद्दल मुख्य सचिवांनी समाधान व्यक्त केले. राजभवन परिसरातील निसर्ग माहिती केंद्रात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बायोडायव्‍‌र्हसिटी गार्डन व राजभवन परिसरावर आधारित असलेला माहितीपट बघितला.
यावेळी मुख्य सचिवांसह इतर अधिकाऱ्यांनी कॅक्टस गार्डन, नक्षत्र वन, फुलपाखरु उद्यानाचीही पाहणी केली. सन २००८ साली बॉटनिकल गार्डनची स्थापना झाल्याची माहिती रवींद्र वानखेडे यांनी यावेळी दिली.
या बगिच्यात विविध प्रकारच्या गुलाबांची २५० झाडे तसेच कॅक्टस, बांबू, पाम, वड, मोह, आवळा, आपटा यासह १६ हजारपेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे बॉटनिकल गार्डनमध्ये असून मोरासह १८० विविध प्रजातींचे पक्षी, फुलपाखरांच्या विविध प्रजाती राजभवन परिसरात वास्तव्यास आहेत.