पाच हजार किलो मटण..१५ हजारांहून अधिक भाक ऱ्या, बासमती तांदळाचा गरमागरम भात आणि चकण्याला जिताडा. मागेल त्याच्यासाठी मद्याचा प्यालाही भरलेला. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे पांग फेडण्यासाठी शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क नेते एकनाथ िशदे यांनी ठाणे आणि कल्याणात स्नेहभोजनाचा अक्षरश: धडाका लावला असून या गावजेवणातील मटण-भाकरीवर ताव मारत हजारो कार्यकर्ते सध्या िशदेशाहीचा जयघोष करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, एकीकडे मटण, मासळीवर ताव मारला जात असताना ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील काही संघवाल्यांसाठी भाकरी-पिठल्याचा वेगळा बेतही यावेळी मांडण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत ठाणे जिल्ह्य़ातील चारही लोकसभा मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. निकालानंतर हा विजय बराच मोठा भासत असला तरी प्रत्यक्ष निवडणुका सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधी उमेदवारांना लढत देताना युतीच्या उमेदवारांना अक्षरश: घाम फुटल्याचे चित्र होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ िशदे यांनी आपल्या मुलाला िरगणात उतरवून मोठा राजकीय जुगार खेळला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघातून राजू पाटील यांना िरगणात उतरवल्याने िशदे यांची खेळी त्यांच्या अंगलट येणार असे चित्र काही काळ निर्माण झाले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातही काही वेगळे चित्र नव्हते. एकनाथ िशदे कल्याणात अडकल्याने राजन विचारे यांचा प्रचार फारच अनियंत्रित होता. मोदी लाटेचा फारसा अंदाज आला नसल्याने ठाणे शिवसेनेतील काही प्रतापी नेते राजन विचारे यांच्या नावाने जाहीरपणे ठणाणा करताना दिसत होते. प्रत्यक्षात निकाल लागला आणि मोदी लाटेवर आरूढ होत ठाणे, कल्याणात शिवसेनेचे उमेदवार काही लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले.
विजयाचा जल्लोष अजूनही सुरूच..
दिसतो तितका हा विजय सोपा नव्हता हे लक्षात आल्याने शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ िशदे यांनी ठाणे, कल्याणातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे पांग फेडण्यासाठी सध्या जोरदार पाटर्य़ाचा (या पाटर्य़ाना स्नेहभोजन असे नाव देण्यात आले आहे) धडाका लावला असून या मेजवानीला शिवसैनिकांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आमंत्रित केले जात असल्याने युतीच्या गोटात विजयाचा जल्लोष अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विजयी मेजवानीचा पहिला बार ठाण्यातील ओवळा भागातील एका भल्यामोठय़ा लॉनवर उडविण्यात आला. या मेजवानीसाठी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर भागातील सुमारे पाच हजार सक्रिय कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सुमारे दोन हजार किलो बोकडाचे मटण आणि तांदळाच्या भाक ऱ्या असा खास मेनू या मेजवानीसाठी ठेवण्यात आला होता. यापाठोपाठ बुधवारी रात्री अंबरनाथ परिसरात िशदे यांच्या पुढाकाराने कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर भागातील युतीच्या कार्यकर्त्यांसाठी भलीमोठी मेजवानी ठेवण्यात आली होती. त्यासाठी भिवंडीचे भाजपा खासदार कपिल पाटील यांना खास निमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले होते. ठाणे, कल्याण, भिवंडीच्या खासदारांचा जंगी सत्कार केल्यानंतर मटण-भाकरी आणि सोबतीला तळलेला जिताडा मासा अशा जेवणावर सुमारे पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी मनमुरादपणे ताव मारला. यावेळी मद्याची खास व्यवस्था करण्यात आली होती. मात्र एकनाथ िशदे स्वत: जातीने प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून त्याचे आभार मानत असल्याने इच्छा असूनही साहेबांसमोर पेग रिचवणे अनेकांना जमले नाही.