रुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र त्यांचा लाभ घेण्याचा निकष, आवश्यक कागदपत्रांची पुर्तता आणि त्यात होणारा कालपव्यय, भावनिक स्तरावर येणारे नैराश्य, आर्थिक ओढाताण या एकंदर स्थितीमुळे योजनांचा मूळ उद्देश पूर्णपणे साध्य होत नाही. स्वत दुर्धर आजाराने त्रस्त असताना अशा बाल रुग्णांसाठी काही करता येईल का, या विचाराने प्रेरीत होत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता डॉ. प्रशांत वाघ हे ‘श्री निरंजन कॅन्सर चाईल्ड पेशंट सोसायटी’च्या माध्यमातून बाल कर्करुग्णांसाठी काम करत आहेत. तीन वर्षांत ४५ बालकांपर्यंत साडे नऊ लाखांची मदत संस्थेच्या माध्यमातून पोहोचली आहे. दुसरीकडे, भविष्यात या बालकांसाठी काम करताना शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवा आयाम देणारी ‘बालनाटय़ चळवळ’ अधिक जोमाने पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात श्री दामोदर प्रॉडक्शनच्या माध्यमातून डॉ. प्रशांत नावाचा एक युवा चेहरा बालनाटय़ात विविध प्रयोग करत आहे. मूळ मुंबईचे असलेले डॉ. प्रशांत शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात सई परांजपे, सुधा करमरकर आणि सुलभा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाटकांमधून अभिनयाचे धडे गिरवत होते. बालनाटय़ स्पर्धेपासून सुरू झालेला त्यांचा नाटय़ प्रवास प्रायोगिक नाटकांपर्यत स्थिरावला. आर्थिक परिस्थितीकडे कानाडोळा न करता ‘तुझी आवड तु जोपासु शकतो’ हा आई वडिलांनी दिलेला सल्ला मानत त्यांनी कामाला सुरूवात केली. या कालावधीत कौटुंबिक तसेच अन्य काही कारणास्तव अनपेक्षितपणे नाशिकमध्ये स्थिरावण्याचा डॉ. प्रशांत यांनी प्रयत्न केला. वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांना शहराचे सांस्कृतिक क्षेत्र खुणावू लागले. काम करताना अभिनयाची आवड जोपासली जावी, यासाठी त्यांनी सुरूवातीला काही बाल गोपाळांना सोबत घेत गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी एक छोटी एकांकिका बसविली. एकांकिकेला मिळालेला प्रतिसाद पाहता अभिनय शिबीर घेण्याचा प्रस्ताव पालकांकडून आला. त्या प्रस्तावाला होकार देत ‘दुर्गा झाली गौरी’ या बालनाटय़ाचा शुभारंभ झाला. त्यानंतर दिलीप प्रभावळकरांचे ‘बोक्या सातबंडे’, ‘बजरबट्टु’, ‘परिकथेतील राजकुमार’ असे एकापेक्षा एक सरस बालनाटय़ांची निर्मिती त्यांनी केली. प्रेक्षकांकडून नाटकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दुर्गाचे एकाच दिवशी पाच प्रयोग आणि तेही हाऊसफुल अशी अविस्मरणीय कामगिरी त्यांच्या नाटय़ संस्थेकडून झाली आहे. रंगभूमीवर विविध प्रयोग करताना चंदेरी दुनियेत विविध तारांकित व्यक्तींना त्यांनी आवाज दिला. यशराज प्रॉडक्शनच्या माध्यमातून डबिंगचे काम सुरू असून शबाना आझमी, नसिरूद्दीन शाह यांच्या सोबत काव्यवाचन तसेच काही नाटकांच्या तालमी सुरू आहेत.
‘ऑल इज वेल’ असतांना त्यांच्या सततच्या दुखण्याचे निदान ‘रक्ताचा कर्करोग’ असे झाले. तेव्हा पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांचा सराव आणि अभ्यास सुरू होता. कर्करोग आणि त्यात रक्ताचा हे लक्षात आल्यावर भावनिक पातळीवर सारे काही संपले, अशीच काही भावना निर्माण झाल्याने नाटक, आपले काम, नव्या कल्पना सारे विचार मनातून हद्दपार झाले. अगदी बोटावर मोजण्याइतके दिवस या मानसिकतेत घालवल्यानंतर डॉ. प्रशांत यांनी नैराश्य झटकत पुन्हा एकदा नव्याने खेळ मांडण्याचे ठरवले. त्यादृष्टीने जेवढे आयुष्य आपल्या हाती आहे, त्यात नाशिक येथे स्थिरस्थावर होत नाटय़क्षेत्रात काम करण्याचा इरादा पक्का केला.
डॉ. प्रशांत यांच्या नाटकाचा प्रयोग कालिदास येथे सुरू असताना एक महिला तिकीट खरेदीसाठी पैसे नाहीत, माझ्या मुलास कर्करोग आहे, त्याला नाटक पहायचे असून ते पहाता येईल काय, ही विनंती करत होती. संयोजकांसह सर्वानी त्यास होकार दिला. मात्र त्याच वेळी अशा हलाखीच्या परिस्थितीत आजाराशी दोन हात करणाऱ्या चिमुकल्यांचे काय, हा प्रश्न डॉ. प्रशांत यांना अस्वस्थ करून गेला. आपणास वयाच्या २४ व्या वर्षी कर्करोग कळाला. या बालकांना आपल्याला काय आजार हे सुध्दा माहीत नाही. त्यांना जगण्याचा आनंद सहज लुटता यावा, आपल्या परीने त्यांना काही तरी मदत व्हावी यासाठी कर्करोगाने ग्रस्त अशा शून्य ते १६ वयोगटातील बालकांसाठी त्यांनी श्री निरंजन कॅन्सर चाईल्ड पेशंट सोसायटी या संस्थेची स्थापना केली. संस्थेचे वैशिष्ठय़े म्हणजे कोणास आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात येत नाही. तुम्हाला मदत करायची असेल तर बालनाटय़ाचे प्रयोग ठेवा, तुम्ही पहा, इतरांना दाखवा, लहान बालकांकडून बाल रुग्णांना केलेली छोटीसी मदत म्हणून याकडे पहा असे आवाहन केले जाते. त्यांच्या आवाहनास नाशिकसह राज्यातील विविध सामाजिक संस्थानी प्रतिसाद दिला. त्यांच्या बालनाटय़ाचे प्रयोग अमेरिका, स्वीडन, लंडन येथे झाले आहेत. राज्य शासनाने डॉ. प्रशांत यांच्या बाल नाटय़ाला गौरविले आहे. संस्थेच्या ‘शामची आई’ या नाटकाचा प्रयोगाचा संपूर्ण निधी हा संस्थेला जातो. तसेच इतर बालनाटय़ाच्या कमाईतील २५ टक्के रक्कम ही संस्थेसाठी वापरली जाते. या माध्यमातून आजवर ४५ कर्करोगाने त्रस्त बालकांपर्यंत मदत पोहचली आहे. वाढदिवस तसेच अन्य काही कारणास्तव संस्थेला मदत करायची असेल तर ती वस्तु स्वरूपात स्विकारत ती त्या त्या बालकांना दिली जाते. कर्करोग म्हटला की संपुर्ण घर नैराश्याच्या खाईत लोटले जाते. त्यात जर रुग्ण एखादा लहान बालक असेल तर परिस्थिती अधिक बिकट असते. अशा बालकांना कुठल्याही सहानुभूतीशिवाय मदत करण्याचे आव्हान आपण स्विकारल्याचे डॉ. प्रशांत यांनी नमूद केले. आजाराचा बाऊ करण्यापेक्षा आहे तो प्रत्येक क्षण मनमुराद जगा. रडत, कुढत बसण्यापेक्षा जगण्याशी दोन हात करा. औषध-गाणे, वाचन, योग्य आहार या त्रिसूत्रीवर आजारावर मात कशी करता येईल यादृष्टिने आपले काम सुरू असल्याचे ते म्हणतात.