महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्षात आलेली मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्षांची महाआघाडी महिला बालकल्याण समितीच्या निवडणुकीतही कायम राहिली आहे. यामुळे महिला बाल कल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रंजना बोराडे यांनी सेना-भाजप युतीच्या मनीषा हेकरे यांचा सहा विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. उपसभापतीपदी मनसेच्या सुवर्णा मटाले विजयी झाल्या. त्यांनी हेकरे यांना पराभूत केले. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या समितीवर महाआघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली. साधारणत: दीड महिन्यापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी भाजपने मनसेची साथ सोडून शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी पालिकेवरील सत्ता अबाधित राखण्यासाठी मनसेने काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष गटाला सोबत घेतले. संबंधितांची महाआघाडी पुढील निवडणुकीत कायम राहणार असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. महिला बालकल्याण समितीत मनसेचे तीन, राष्ट्रवादीचे दोन, तर काँग्रेसचा एक आणि उर्वरित तीन सदस्य सेना-भाजपचे आहेत. मनसेतर्फे सुमन ओहोळ, राष्ट्रवादीकडून रंजना बोराडे, शिवसेनेतर्फे मनीषा हेकरे यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीआधी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष गटाची संयुक्त बैठक झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असल्याने सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी करण्यात आली. मनसे व काँग्रेसनेही त्यास संमती दिल्यानंतर सभापतीपद राष्ट्रवादीला तर उपसभापतीपद मनसेला देण्याचे निश्चित झाले. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सभापतीपदाच्या निवडणुकीतून मनसेच्या उमेदवाराने माघार घेतली. यामुळे महाआघाडी विरुद्ध सेना-भाजप अशी लढत झाली. त्यात राष्ट्रवादीच्या बोराडे यांना सहा तर सेनेच्या हेकरे यांना तीन मते मिळाली. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेच्या सुवर्णा मटाले यांनी हेकरे यांचा तीन मतांनी पराभव केला. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.