दिवाळीचा पाडवा व बालदिन एकत्र आल्याचे औचित्य साधत शहरात काही ठिकाणी आगळेवेगळे उपक्रम राबवले गेले. स्नेहालय संस्थेतील बालकांनी हाती झाडू घेत लालटाकी येथील पंडित नेहरूंच्या पुतळ्याची व उद्यानाची सफाई केली. केडगावच्या जनजागृती मंचने उपनगरातील शालेय मुलांना एकत्र करत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश दिला. नगरच्या नेहरु युवा केंद्राने मुलांच्या उपस्थितीत वर्धापनदिन साजरा केला.
बालदिनाचा कार्यक्रम विविध संघटना व संस्थांनी साजरा केला. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लालटाकी येथील नेहरु पुतळा व उद्यान अस्वच्छतेच्या व अवैध व्यवसायाच्या विळख्यात सापडले आहे. स्नेहालयमधील सुमारे ८० बालकांनी सकाळीच लवकर येऊन पुतळा व उद्यानाची सफाई केली. सर्वत्र सडा टाकून रांगोळीही काढली. बालकांनी राष्ट्रप्रेमाच्या घोषणा देत ‘गांधीगीरी’ही केली. एकेकाळी लहान मुलांचे वैभव असलेले उद्यान आज नाहिसे होत असल्याचे मुलांना दिसले. या उद्यानात पुन्हा कारंजे सुरु व्हावे व लहान मुलांना येथे आनंद मिळावा, पंडितजींचे लहान मुलांवर असलेले प्रेम त्यांच्या स्मृतीतून जागृत व्हावे, अशी अपेक्षा, संस्थेचे समन्वयक संदिप कुसळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. निवृत्त शिक्षक धर्मराज औटी यांच्या हस्ते नेहरुंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमिला उबाले, समाधान घलगुडे आदी उपस्थित होते.
केडगाव येथील जनजागृती मंचच्या माध्यमातून संजय आंधळे, डॉ. प्रशांत महांडुळे, डॉ. शारदा महांडुळे, शिवाजी थोरात, गणेश थोरात यांनी उपनगरातील शालेय मुलांना एकत्र करत प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला. नंतर मुलांची नेहरु पुतळा, स्नेहालय संस्था याठिकाणी सहल नेण्यात आली. स्नेहालय संस्थेतील मुलांना दिवाळीचा फराळ देत त्यांच्यासमवेत फराळाचा आस्वाद घेतला. प्रणव रुग्णालयात डॉ. महांडुळे यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व, डॉक्टर व समाजसेवा याचे महत्व, वैद्यकीय उपकरणे व आजार याची माहिती दिली.
नेहरु युवा केंद्राच्या नगर शाखेचा वर्धापन दिन बालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. दिनेश शिंदे व अजित वाघमारे या मुलांच्या हस्ते पंडित नेहरुंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनी शेट्टी होत्या. त्यांनी उपस्थितांना ‘स्त्री भ्रुण हत्या विरोधी’ शपथ दिली. केंद्राचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत गायकवाड यांनी
नेहरुंच्या कार्याची माहिती दिली. प्रा. रमेश वाघमारे, शाहिर वसंत डंबाळे यांची भाषणे झाली. प्रमुख
पाहुणे म्हणून दत्ताशेठ जाधव, राजेंद्र उदागे, संजय भिंगारदिवे, प्रसाद
भडके, माया जाधव, तुषार
रणनवरे, बाळासाहेब पाटोळे, नाना डोंगरे, नयना बनकर आदी उपस्थित होते.