गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ‘व्हायरल फिव्हर’च्या भस्मासुराने नागपूर शहराला ग्रासले आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून दवाखान्यात रांगा दिसत आहे. साधारण जरी ताप आला तरी दवाखान्यात येऊन तपासणी करावे, असे डॉक्टरांनी सांगितले.
वातावरणात काही दिवसांपासून बदल होत आहेत. त्याचा परिणाम सर्वावर झाला आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, पाठदुखी आदींनी त्रस्त असलेले रुग्ण मेडिकल, मेयो रुग्णालयातील बाह्य़ विभागात अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच आजाराच्या रांगा शासकीय व खाजगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात दिसत आहे. फुफ्फुसातील विषाणू मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळे आजारामध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
खोकलताना विषाणू ३० सेंटिमीटरच्या आत काही काळ हवेत राहात असल्याने यावेळी संपर्कात येणाऱ्यांना साथीचे आजार बळावतात. परिणामी प्रतिकार शक्ती कमी होते. अशावेळी प्रतिजैविके घेऊन चालत नाही. साथीचे रुग्ण परस्पर औषधे घेत आहेत. परंतु, डॉॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णांनी कोणतेही औषध घेऊ नये. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून औषधे काही कालावधीसाठी घ्यावी. काही रुग्ण डॉक्टरांकडे जातात, औषधं घेतात पण, जरा बरे वाटले की मध्येच औषधं बंद करतात. अनियमित औषध घेतल्याने विषाणू व जिवाणू वातावरणात पसरत राहतात. बालकांच्या आरोग्यावरही या वातावरणाचा विपरीत परिणाम होत आहे. लहान मुलांना ताप आल्यास जर तो आटोक्यात आला नाही तर मुलांना झटके येतात, यासाठी काळजी घ्यावी, असेही डॉ. खळतकर यांनी सांगितले. कपाळावर पट्टय़ा ठेवताना डॉक्टरांचा सल्ला घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मुलाला डॉक्टरांच्या नजरेखाली ठेवावे. मोठय़ांनी बालकांच्या सान्निध्यात राहू नये. बालकांना शांत खोलीत आराम करू द्यावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
ल्ल खोकला आल्यावर रुमाल तोंडासमोर धरा, हिरव्या पालेभाज्या, फळांचा वापर आहारात करावा, रोगप्रतिबंधक लसीकरण बालकांना द्या, पाणी भरपूर व उकळून प्यावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी, उघडय़ावरील वा बाहेरील पाणी पिणे टाळावे.