शहरातील जयभवानी गृहनिर्माण संस्थेमधील महापालिकेची खुली जागा नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्रीस्वामी गुरूपीठास कायमस्वरूपी विनामूल्य देण्याचा ठराव महापालिकेत मंजूर झाल्याचे इतिवृत्तांतात नमूद केल्याने सर्वसाधारण सभेत गदारोळ उडाला. ठरावाच्या सूचक कला ओझा, तर अनुमोदक पंकज भारसाखळे होते. आठ महिन्यांपूर्वीचे जुने इतिवृत्त मंजूर करताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभेत आक्षेप नोंदविले. असा ठराव मंजूर असला तरी त्यावर कार्यवाही झाली नसल्याचा खुलासा मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. स्वयंसेवी संस्थेला विनामूल्य कायमस्वरूपी जागा देता येऊ शकते काय, या प्रश्नावर विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
जयभवानी गृहनिर्माण संस्थेतील ५६८.२० चौ. मी. जागा त्र्यंबकेश्वर येथील स्वयंसेवी संस्थेला युवा व बालसंस्कार केंद्र चालविण्यासाठी, तसेच महिला सक्षमीकरणासारख्या सार्वजनिक हिताच्या उपक्रमासाठी कायमची देण्याचा ठराव मंजूर झाला होता. दि. १८ ऑक्टोबर २०१२ ते २८ मार्च २०१३ या कालावधीतील इतिवृत्ताला मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेतली नव्हती. या मंजुरीची कागदपत्रे शुक्रवारी सभागृहात सादर करण्यात आली. उशिरा इतिवृत्तांत सादर केल्याने आठ महिन्यांपूर्वीचा हा विषय बहुतेक सदस्यांच्या विस्मरणात गेला होता. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अशा प्रकारे मोकळी जागा स्वयंसेवी संस्थेला देता येऊ शकते काय, असा सवाल केला. १५ ते २० कोटी रुपये बाजारमूल्य असणारी ही जागा स्वयंसेवी संस्थेला देणे हा एक प्रकारचा भूखंड घोटाळाच आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
अशा प्रकारे जागा देण्यापूर्वी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती काय, अशी विचारणाही करण्यात आली. हा ठराव मंजूर झाला असला, तरी त्याची नियमाप्रमाणे अंमलबजावणी करणे हे काम प्रशासनाचे असल्याचे नगरसेवक राजू वैद्य यांनी सांगितले. मालमत्ता अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे खुली जागा देता येते की नाही, याचा खुलासा केला. तथापि, तो चुकीचा असल्याचा आक्षेप विरोधकांनी नोंदविला. या प्रश्नावरून सभागृहात गदारोळ झाला.