केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची नियुक्ती झाल्यानंतर पाच महिन्यात राज्यात भाजपची सत्ता येताच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने नागपुरात आता भाजपची दोन सत्ता केंद्रे अस्तित्वात आली आहेत.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर महालातील वाडा विदर्भाचे सत्ता केंद्र झाले होते. विदर्भातील भाजपच्या राजकारणाची सूत्रे वाडय़ावरून हलत होती. त्यामुळे साऱ्या देशाचे लक्ष वाडय़ाकडे होते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आल्यानंतर धरमपेठेतील त्यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असली
तरी सत्ता केंद्र म्हणून महालातील वाडय़ाकडेच बघितले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गडकरी यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांच्यावर देण्यात आलेली जबाबदारी बघता केंद्रात त्यांचे वजन वाढल असल्याने विदर्भात गडकरींचे स्थान मोठे झाल्यामुळे महालातील वाडा हे सत्ताकेंद्र बनले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मिळालेले यश आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर महालातील गडकरी वाडय़ावरची ‘हुकुमत’ आता धरमपेठेतील फडणवीसांच्या बंगल्यावर स्थानांतरित झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईत असले तरी त्यांच्या बंगल्यावर शपथविधीपूर्वी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्यांची वर्दळ वाढू लागली आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एरवी भाजपला यश मिळाले की, वाडय़ासमोर जल्लोष केला जात होता. आता फडणवीस यांची निवड होताच धरमपेठेतील बंगला आणि भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष दिसून आला आणि वाडय़ावर मात्र शांतता होती. निवडणुकीत यशानंतर विदर्भातील आमदारांनी गडकरी यांनी राज्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी करीत वाडय़ावर शक्तिप्रदर्शन करून वाडय़ाचे महत्त्व वाढविले होते. मात्र, त्यात विदर्भातील आमदारांना फार यश आले नाही.
‘तरुण तुर्क’ म्हणून झपाटय़ाने राजकीय क्षितिजावर उदय झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतल्याने शहरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वयंसेवक असलेल्या फडणवीसांच्या पाठीशी संघ वर्तुळही अत्यंत खंबीरपणे उभे आहे. सरसंघचालक मोहन भागवतांचे दिवं. गंगाधरराव फडणवीस, तसेच फडणवीसांच्या काकू व माजी आमदार शोभा फडणवीस यांच्या काळापासून घरोब्याचे संबंध आहेत. आता राज्याची धुरा सांभाळताना या वाटचालीत याचा मोठा आधार फडणवीसांना मिळणार आहे. गडकरी-फडणवीस संबंध अत्यंत मधुर असले तरी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहताना गडकरी समर्थक नाराज होऊ नये, याची खबरदारी फडणवीसांना घ्यावी लागणार आहे. दोन दशकांचा राजकीय अनुभव असलेले फडणवीस यात कितपत यशस्वी होतील, हे येणारा काळच ठरवेल. राजकीय प्रवासात फडणवीस कधीही ना कोणत्याही वादात अडकले ना त्यांनी कोणत्याही गटबाजीत त्यांनी स्वारस्य दाखविलेले आहे.
महापालिका आणि त्यानंतर विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आवाज उठविल्याने स्थानिक जनतेतही त्यांची एक लोकप्रिय नेता म्हणून प्रतिमा निर्माण झालेली आहे. गेल्या दीड वर्षांत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येकाला विश्वासात घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मने जिंकली.
विधानसभेत आदर्श आणि सिंचन घोटाळा बाहेर काढण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. याच आधारावर काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांनी वेळोवेळी अडचणीत आणले. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळताना येणाऱ्या काळात विरोधी पक्षाला ते कसे सामोरे जातात आणि त्यातून कर्जबाजारी झालेल्या राज्याचा विकास कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.