पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती झाडून घेऊन ‘स्वच्छ भारत’ करण्याचा संकल्प काय सोडला, तोच त्यांच्या सहकार्यानाही हाती झाडू धरण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात आणि जाहीरनाम्यात स्वच्छतेचा ‘स’ सुद्धा नाही.  मोदींनी स्वच्छतेचा संकल्प सोडला असला तरीही अभियान राबवण्याच्यादृष्टीने अखेरच्या क्षणापर्यंत चित्र स्पष्ट झाले नव्हते. एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि दुसरीकडे मोदींचा संकल्प, अशा दुहेरी कैचीत आम्ही सापडलो होतो. मोहीम करायची की प्रचार याबाबतचा कोणताही निर्णय स्थानिक पातळीवर झाला नव्हता. गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारने संकल्प सोडला आणि केवळ भाजपच नव्हे तर इतरही सर्व राजकीय पक्षाने यात सहभागी होण्याचे आव्हान केले. संघटन मंत्र्यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. अवघे २४ तास हातात असताना यासंदर्भातील कोणतीही भूमिका ठरलेली नव्हती. त्यामुळे या मोहिमेत कसे व कितपत सहभागी व्हावयाचे याचाही निर्णय झालेला नाही, असे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी म्हणाले.  केंद्र स्तरावर भाजपचे अनेक मंत्री, खासदार या मोहिमेत सहभागी होत असताना आणि प्रसारमाध्यमातून त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध होत असताना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत मोदींच्या स्वच्छतेच्या संकल्पाबद्दल कोणताही संदेश पोहोचला नव्हता. स्वच्छता हा सर्वाच्याच जिव्हाळयाचा विषय असल्यामुळे पक्षभेद विसरून सर्वच राजकीय पक्षांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात असले, तरी विरोधी पक्षांना मात्र हे राजकीय ढोंग वाटत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभे असलेले दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी चक्क या अभियानाला ‘स्टंटबाजी’चे नाव दिले. महात्मा गांधींच्या नावाचा केवळ वापर केला जात आहे. एक दिवसाचे राजकीय ढोंग करून स्वच्छता होत नाही तर ती एक निरंतर प्रक्रिया आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केलेली ही एक केवळ चलाख धुळफेक असल्याचे गुडधे पाटील म्हणाले. मंगळवारी महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी नागपुरात होते व या बैठकीत या मोहिमेतील सहभागांबाबतचा निर्णय घेतला जाणार होता, पण या बैठकीतही स्वच्छता मोहिमेचा साधा उल्लेखदेखील झाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेला उद्या, गुरुवारला किती राजकीय यश मिळते, याविषयीची निश्चिती मोहीम पूर्ण होईस्तोवर तरी कळणार नाही.