औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदमुळे सांगली, मिरजेतील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला असून, बंदला १०० टक्के प्रतिसाद लाभला आहे. शासकीय रुग्णालय, वॉन्लेस इस्पितळ वगळता शहरातील सर्वच औषध दुकाने बंद आहेत.
सांगली जिल्हा केमिस्ट संघटनेने सोमवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष राहुल शहा, सचिव विनायक शेटे आदींसह जिल्ह्यातील बहुसंख्य औषध विक्रेते या मोर्चात सहभागी झाले होते.
संघटनेचे अध्यक्ष शहा यांनी सांगितले, की प्रिस्क्रिप्शनची सक्ती होणार नाही असे जाहीर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अंगदुखीच्या २० गोळय़ांचा तपशील न मिळाल्याने दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. डोकेदुखी, अंगदुखीसारख्या आजारासाठी रुग्ण डॉक्टरांकडे न जाता औषध दुकानातून गोळय़ा घेतात. या किरकोळ बाबींमुळे रुग्णांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. यासाठी तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, औषध विक्रेत्यांच्या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या दुकानावर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा अन्य व औषध प्रशासनाने दिला असतानाही जिल्ह्यातील बहुतांशी औषध विक्री केंद्रे बंद आहेत.