शहरातील सावरकर विद्यालयातील दोन शिक्षकांना मारहाण, तसेच विविध उत्सव-जयंतीच्या नावाखाली गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून चाललेली कर्मचाऱ्यांची लूट व हल्ले यावर पायबंद घाला, या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांनी शैक्षणिक बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील टपरीचालकांनीही मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
सावरकर विद्यालयात किरकोळ कारणांवरून दोन शिक्षकांना मुलाच्या पालकाने बेदम मारहाण केली. यात एकाचा हात मोडला. शहरात विविध उत्सव, जयंती व पुण्यतिथीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून गुंड प्रवृत्तीचे टोळके ब्लॅकमेल करते. प्रसंगी मारहाण व धमक्या दिल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अशा लोकांपासून संरक्षण मिळावे, या साठी कर्मचारी यांच्या विविध संघटनांनी सोमवारी शाळा-महाविद्यालये बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात मोठय़ा संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाल्याने नगर रस्ता दणाणून गेला होता. शहरातील टपरीचालकांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. यात सुगंधी जर्दा, सुपारीवरील बंदी मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.