चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना लागणाऱ्या ऊर्जेच्या वापर कसा केला जावा, वीजदराबाबत जागरूकता या विषयाच्या अनुषंगाने शहरातील हॉटेल रामा येथे परिषदेचे आयोजन केले आहे. ज्या उद्योजकांनी कमी ऊर्जा वापरून अधिक उत्पादन घेतले आहे, त्यांचे अनुभव कथनही होणार आहे.
पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाढता वापर, मर्यादित इंधन साठे तसेच दिवसेंदिवस वाढणारे विजेचे दर लक्षात घेता ऊर्जा बचतीसाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. पवनऊर्जा, सौरऊर्जेचा वापर उद्योगक्षेत्रात करता येऊ शकतो का?, अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे पर्यायी ऊर्जा म्हणून पाहता येऊ शकेल काय, याबाबतही चर्चा होणार आहे. सीएमआयएमार्फत ऊर्जा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन डॉ. ए. के. सिंघल यांच्या हस्ते होणार आहे. हॉटेल, व्यापारी, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सीएमआयएचे अध्यक्ष मिलिंद कंक व मानद सचिव अजित मुळे यांनी केले आहे. या परिषदेचे समन्वयक म्हणून प्रसाद कोकीळ काम पाहणार आहेत.