पालिकेच्या जलतरण तलावात बुडालेल्या चिमुरडय़ाच्या मृत्यूला कंत्राटदार आणि जलतरण प्रशिक्षकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे नमूद करत राज्य ग्राहक आयोगाने या दोघांना दोषी धरले आहे. तसेच संबंधित मुलाच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून ९ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबर २००३ पासून नऊ टक्के व्याजही त्यावर देण्यात यावे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर मुलाच्या आईवडिलांना कायदेशीर लढाईसाठी आलेला खर्च म्हणून अतिरिक्त २५ हजार रुपये देण्याचे आदेशसुद्धा आयोगाने दिले आहेत.
दोन ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी जलतरण शिबीर आयोजित केल्याची जाहिरात पालिकेच्या जलतरण तलावाचे     कंत्राट मिळालेल्या एजन्सीने दिली होती. ती पाहून गीता जेठा आणि त्यांची मैत्रीण शैलजा राणे यांनी आपल्या मुलांचे नाव या शिबिरासाठी नोंदवले. रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊ असा एक तास जलतरणाचे प्रशिक्षण मुलांना देण्यात येणार होते. जलतरण तलावात उतरण्यापूर्वी सर्व मुलांना जीवरक्षक जाकीट देण्यात यायचे. त्यानंतर ४० मिनिटांनी प्रशिक्षक शिटी वाजवून सगळ्या मुलांना तलावातून बाहेर येण्यास सांगत. घटनेच्या दिवशीही जेठा या नेहमीप्रमाणे मुलगा रोहन याला घेण्यासाठी जलतरण तलावाजवळ पोहचल्या. शिबिरातील शेवटचा मुलगा बाहेर येईपर्यंत बाहेर त्या रोहनची वाट पाहत होत्या. परंतु तो काही आला नाही. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षकाकडे त्याच्याबाबत विचारणा केली आणि रोहनची शोधाशोध सुरू झाली.
तो कुठेच न सापडल्याने प्रशिक्षकाने रोहनला शोधण्यासाठी जलतरण तलावात उडी घेतली तेव्हा बेशुद्धावस्थेत पडलेला रोहन त्यांना दिसून आला. त्याला बाहेर काढून तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर जेठा यांनी या प्रकरणी ग्राहक आयोगाकडे धाव घेत कंत्राटदार आणि प्रशिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार नोंदवली व नुकसान भरपाईची मागणी केली.
प्रशिक्षणासाठी मुलांना प्रशिक्षकाच्या हवाली करणे एवढय़ापुरतीच आपली जबाबदारी मर्यादित असल्याचा आणि आपल्याकडून काहीही चूक झाली नसल्याचा दावा सुनावणीच्या वेळेस कंत्राटदारातर्फे करण्यात आला. तर जलतरण तलावात उतरण्यापूर्वी जीवरक्षक जाकीट परिधान करणे हे मुलांना बंधनकारक करण्यात येते. रोहनने आपल्याकडे स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी मागितली व आपण त्याला ती दिली. नंतर बहुधा तो जीवरक्षक जाकिटाविनाच जलतरण तलावात उतरला असावा व त्यामुळेच बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा दावा प्रशिक्षकाने आपल्या बचावार्थ केला. परंतु प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रत्येक मुलाची काळजी घेणे ही प्रशिक्षकाची जबाबदारी असून ही जबाबदारी तो झटकू शकत नाही. त्यामुळे रोहनच्या मृत्यूसाठी त्याचा व कंत्राटदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे नमूद करत आयोगाने त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.