मित्र म्हटले की सर्वात पहिल्यांदा आठवण येते ती महाविद्यालयीन मित्रांच्या कट्टय़ाची. एकत्र बसून कटिंग चहा मारणं, तास बुडवून गप्पांची मफिल रंगवणं, ग्रुपमधल्या एखाद्याची सेटिंग लावून देणं या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून झरझर निघून जातात. मैत्रीची जान असलेला कॉलेजचा कट्टा ‘फ्रेंडशीप डे’च्या दिवशी सुनासुना राहणे शक्यच नाही.
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी येणारया या मैत्रीच्या दिवसाची जय्यत तयारी विविध महाविद्यालयांच्या कट्टय़ांवर सुरू असते. जून-जुल महिन्यामध्ये महाविद्यालय सुरु होते, त्यामुळे या दिवसाच्या माध्यमातून सगळ्यांशी ओळखी करून घेण्याची आयती संधी मिळते. मग फ्रेंडशीप बॅण्ड्स, भेटवस्तू घेण्यासाठी पशांची जुळवाजुळव केली जाते. मित्रांची नावे लिहिण्यासाठी खास पांढरेशुभ्र टी-शर्ट राखून ठेवले जातात, कधी नव्हे तर स्केचपेन नीट चालतंय की नाही हेही त्यासाठी तपासले जाते. यंदा महाविद्यालयांमध्ये फ्रेंडशीप डे साजरा करायची उत्सुकता सर्वाना असली तरी कमावते नसल्याने, पशांची उधळपट्टी न करता कमी खर्चात पण दिसायला झोकदार असे स्वत: काहीतरी बनवून मित्रांना द्यायचा विचारही काही तरुण करतात. मग त्यामध्ये नेहमीची सॅटिन रिबीन हातावर बांधण्यापेक्षा दोन-तीन रिबिन्सपासून वेगळा बॅण्ड बनवला जातो. अर्थात ज्यांना फ्रेंडशीप बॅण्ड्सवर पसे खर्चायची इच्छा आहे त्यांच्यासाठी बाजारात कॉपरचे, घडय़ाळ्याच्या आकारातील, एकमेकांची नावे लिहिलेले, अगदी दोन मित्रांची छायाचित्रे लावून मिळणारे बॅण्ड्सही बाजारात उपलब्ध आहेत.भेटवस्तूंवर खर्च करण्यापेक्षा यंदा तरुणाई हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करण्यावर जास्त प्राधान्य देत आहे. कारण शोभेच्या भेटवस्तू नंतर घरी पडून राहतात, त्यामुळे पैसे खर्चून निदान पोट भरण्याची तृप्ती अनुभवायचे बेत रंगताहेत. भेटवस्तू द्यायची झाल्यास चॉकलेट्स, मुलींमध्ये पेंडेंट्स, इअरिरग्स अशा उपयोगी वस्तू देण्याकडे यंदा जास्त कल आहे. याशिवाय मित्रांसाठी स्वत: रंगवलेली भेटकार्डे, टी-शर्ट्स, फोटो अल्बम्स तयार केले जात आहेत. सध्या सर्वचजण गॅजेटप्रेमी झाल्यामुळे फ्रेंडशीपचा संदेश लिहिलेली मोबाइल किंवा लॅपटॉप कव्हर्सचा पर्यायही तरुणांसमोर आहे.एकमेकांना भेटवस्तू देण्याऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे गाणे गायचे, मित्राला आवडेल अशी एखादी गोष्ट त्याच्यासाठी करायचे बेतही काहीजण आखत आहेत. तर काहीजण आपल्या मित्रांसाठी खास आपल्या हाताने केक, कुकीज, पुिडग बनवणार आहेत. काही ग्रुप्स यानिमित्ताने वृद्धाश्रमाला किंवा अनाथालयालाही भेट देणार आहेत. फ्रेशर्स पार्टी आणि फ्रेंडशीप डे यांचा एकत्र योग साधून काही महाविद्यालयांमध्ये डीजे नाईट आणि इतर कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. यामुळे थोडक्यात यंदाही फ्रेंडशीप डे दणक्यात साजरा करायचे बेत असले तरी पसे वाचविण्याची आणि योग्य कारणासाठी ते खर्च करण्याची मोहिमही तरुणाई राबवणार असल्याचे चित्र आहे.