सेलू येथील हुतात्मा स्मारकाच्या उत्तरेकडील संरक्षण िभतीलगत नगरपालिका व्यापारीसंकुल बांधण्याच्या तयारीत आहे. मात्र, हे बांधकाम करू नये, अशी मागणी अ‍ॅड. श्रीकांत वाईकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी या बांधकामास स्थगितीबाबतचे आदेश काढले.
सेलू येथे नूतन विद्यालयासमोर हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या उत्तरेकडील भागात रहदारीचा रस्ता आहे. स्मारकाच्या संरक्षक िभतीलगतच नगरपालिकेने व्यापारीसंकुल उभारण्याचा घाट घातला आहे. या संकुलामुळे रस्त्यावर वर्दळ होऊन अपघाताचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या जीवित संरक्षणाचा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे.
व्यापारीसंकुलामुळे हुतात्मा स्मारकाचा दर्शनी भागही झाकला जाणार आहे. त्यामुळे हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्याच्या मूळ उद्देशालाच धक्का पोहोचत आहे. हुतात्मा स्मारक हे स्वातंत्र्यसैनिक व नागरिकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे हे बांधकाम करू नये, असा आदेश पालिका प्रशासनास द्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर अ‍ॅड. श्रीकांत वाईकर, स्वातंत्र्यसैनिक समितीचे सहसचिव बाबासाहेब चारठाणकर, स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्ष प्रभाकर वाईकर, माणिकचंद बिनायके, राजेश अंबोरे आदींच्या सह्य़ा आहेत. स्वातंत्र्यसैनिकांनी या प्रकरणी पालकमंत्री प्रकाश सोळंके यांचीही भेट घेतली.
संरक्षण िभतीलगतच व्यापारीसंकुल बांधणे म्हणजे हुतात्मा स्मारकाच्या संकल्पनेलाच धक्का पोहोचविणारी बाब असल्याचे मत स्वातंत्र्यसैनिकांनी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनी हुतात्मा स्मारकाच्या संरक्षण िभतीलगत चालू असलेले काम तातडीने थांबविण्यासंदर्भात स्थगिती दिली. सेलूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच या बाबत पुढील कार्यवाही होईल. अहवालापर्यंत सद्य:स्थितीत कोणतेही बांधकाम करू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भविष्यातही या जागेवर व्यापारीसंकुलाचे काम करू नये, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिकांनी केली आहे.