सक्तीने गोळा केलेला निधी हा खंडणीचा प्रकार असल्याचे विधान पोलीस आयुक्तांनी नुकतेच चिंचवडला उद्योजकांच्या बैठकीत केले. मात्र, पुणे पोलीस कल्याण निधीसाठी आयोजित कार्यक्रमासाठी पोलिसांकडूनच सक्ती केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. ठरवून दिलेले टार्गेट गाठण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनीच २५ हजाराच्या प्रवेशिका घेण्याचे अघोषित फर्मान नगरसेवक, उद्योजक, व्यापारी व हॉटेलवाले आदींना सोडले आहे. त्यानुसार, संबंधितांना ठाण्यात बोलावून किंवा घरी पाठवून हा निधी पदरात गोळा केला जात आहे. तथापि, कोणतीही सक्ती होत नसून स्व:खुशीने प्रवेशिका घेतल्या जात असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात येत आहे.
बालेवाडी संकुलात २४ डिसेंबरला ‘स्वरतरंग- २०१२’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून मराठीतील आघाडीची संगीतकार जोडी व चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलावंत व तारकांचे कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे. पोलीस कल्याण निधीसाठी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पोलीस अधिकाऱ्यांना भले मोठे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. त्यांनी हाताखालील मंडळींना कामाला लावले आहे. पोलीस ठाण्याशी नियमित संबंध येणारे शहरातील नगरसेवक, कार्यकर्ते, उद्योजक, हॉटेलवाले, कंपनीचालक, बांधकाम व्यावसायिक, केबलवाले आदींना या प्रवेशिका देण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. २५ हजाराचा ‘व्हीआयपी’ पास असून एक हजाराच्या २५ प्रवेशिका असलेले २५ हजाराचे पुस्तक आहे. पत पाहून २५ हजाराचा ‘व्हीआयपी’ पास गळ्यात मारण्यात येत असून धनदांडग्यांना प्रत्येकी २५ हजाराच्या किमान चार प्रवेशिका दिल्या जात आहेत. सामान्य कुवतीच्या मंडळींना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या २५ प्रवेशिकांचे पुस्तक देण्यात येत आहे. दोन नंबरवाले व अवैध धंदे चालवणारे यांनाही नेहमीपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागत आहे. निधी देणे ज्यांना शक्य नाही, ते पोलिसांचा ससेमिरा चुकवित आहेत, तर त्यांना शोधून काढण्याचे कौशल्य पोलीसही दाखवत आहेत. पोलिसांशी नियमितपणे संबंध येत असल्याने प्रवेशिका न घेतल्यास त्यांची नाराजी ओढवली जाईल व ती आपल्याला महागात पडेल, या भीतीने निधी देण्याची मानसिकता अनेकांनी केली. ऐपत नाही त्यांनी हा भार दुसऱ्यावर टाकून आपली मान सोडवून घेतली आहे. या संदर्भात पैसे द्यावे लागले म्हणून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, पोलिसांकडे सतत कामे निघतात, त्यांना नाराज करून चालत नाही म्हणून प्रवेशिका स्वीकारल्याचे मान्य केले. तथापि, चांगल्या संबंधातून तसेच विनंती करूनच प्रवेशिका दिल्या जात असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.