पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि व्हिजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘चला वाचू या’ या अभिनव उपक्रमातील दुसऱ्या पुष्पात संगीतकार कौशल इनामदार अतिथी अभिवाचक म्हणून सहभागी होणार आहेत.
लोकांमध्ये वाचनाची आवड वाढीस लागावी आणि पुस्तके, साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे, या उद्देशाने ‘चला वाचू या’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दुसऱ्या पुष्पाचा कार्यक्रम ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता रवींद्र नाटय़ मंदिर, पु. ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी येथे होणार आहे. दिवंगत नाटककार प्र. ल. मयेकर यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून या कार्यक्रमात मयेकर यांच्या लेखनासहित अन्य निवडक साहित्याचे अभिवाचन केले जाणार आहे. यात लेखक व दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, अभिनेते अक्षय शिंपी, अमृता मोरे, आशीर्वाद मराठे, मानसी मराठे, डॉ. उत्कर्षां बिर्जे, दीपक कदम हेही सहभागी होणार आहेत. अभिवाचनाच्या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे आणि ‘व्हिजन’चे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.