कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर चांगलाच वाढता राहिल्याने धरणाचे दरवाजे आणखी काही फुटांवर उचलणे अपरिहार्य झाले असून, उद्या शनिवारी सकाळी धरणाचे दरवाजे आणखी काही फूट उचलण्याची शक्यता प्रांताधिकारी संजय तेली यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.  
कोयना धरण क्षेत्रासह कृष्णा, कोयना नद्यांकाठी पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत आहे. तर, कोयना धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत आहे. पावसाळी हंगामाच्या ४१ दिवसातच अनपेक्षित व विक्रमी पाणीसाठा नोंदला गेल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे परवा दुपारी एकच्या सुमारास दोन फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात करण्यात आलेला विसर्ग कायम आहे. दरम्यान, संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेल्याने ३५ गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.
धरणाची जलपातळी १ ऑगस्टपर्यंत २,१४१ फुटांवर नियंत्रित करण्याचे धरण व्यवस्थापनाचे नियोजन असून, सध्या धरणात २७,०४६ क्युसेक्स पाण्याची आवक होताना कोयना नदीपात्रात १०,३४७ क्युसेक्स पाणी विसर्ग करण्यात येत आहे. आवक पाण्याच्या तुलनेत धरणातून कोयना नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग ६१.१७ टक्क्यांनी कमी असल्याने धरणाची पाणी पातळी वाढतच आहे.
चालू हंगामाच्या ४३ दिवसातच १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना जलाशयात सुमारे ५६ टीएमसी पाण्याची आवक होऊन पाणीसाठा ८२.६९ टीएमसी म्हणजेच  ७८.५६ टक्के आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा तुलनेत गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक असल्याची आकडेवारी आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रात धो-धो तर धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात आज दिवसभरात पावसाची रिपरिप राहिल्याने जनजीवन विस्कळीत आहे. सततच्या पावसामुळे खरिपाच्या उर्वरित पेरण्या खोळंबल्या आहेत.
आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत गेल्या ३६ तासात धरणक्षेत्रातील प्रतापगड विभागात २०२ एकूण ३,२९०, नवजा विभागात १७९ एकूण ३,२९२ मि. मी., महाबळेश्वर विभागात १७७ एकूण २,८४० तर, कोयनानगर विभागात १३८ एकूण २,६२६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सरासरी कराड तालुक्यात ७.६५ एकूण २४६.२९ तर, पाटण तालुक्यात २५.६ एकूण ९१६.६८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय सरासरी व कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये – सातारा १२.३ (४३४.५), जावली २०.५ (७६५.९), कोरेगाव २.६ (१९९.२), वाई ७.२ (४०८), महाबळेश्वर ४०.४ (११४४.७), खंडाळा ४.३ (२४०.९) तसेच दुष्काळी फलटण शून्य (१३१.३), माण ०.१ (९६.५), खटाव ३.२(१५८.७).