राजकारण्यांतील कुरघोडीच्या स्पर्धेमुळेच कोल्हापूर जिल्हा बँकेची अवस्था झाली तशी‘गोकुळची करू देऊ नका, असा सल्ला कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे (गोकुळ) ज्येष्ठ संचालक आनंदाराव पाटील-चुयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. उत्पादकांना चांगला दर द्यायचा झाला तर भविष्यात अवास्तव खर्चावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याचेही चुयेकर यांनी सांगितले.
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे‘गोकुळचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात गोकुळच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. परंतु दूध उत्पादकांना एक लीटर दूध उत्पादनासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या तुलनेत कमी दर दिला जातो, हे मान्य करत‘गोकुळचा अवास्तव खर्च वाढल्याचेही त्यांनी कबूल केले. सर्वसामान्यांना जगण्याचा आधार असलेल्या‘गोकुळचीही अवस्था तशी करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
नवीन सहकार कायद्यानुसार‘गोकुळच्या सुमारे २२०० दूध संस्थांवर गंडांतर येणार आहे. नवीन कायद्यात सहकारी संस्था वाचवण्याच्या दृष्टीने काही चांगले बदल करण्यात आले आहेत. परंतु संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी खासगी लेखापरीक्षक नेमणे म्हणजे स्वत:च्या कामाचे मूल्यमापन स्वत: करण्यासारखे आहे. यामुळे संस्थाचालकांवर अंकुश राहणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
भविष्यात सामान्य शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडण्यासाठी जनावरांच्या भाकड काळातही त्या शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक हातभार लावण्यासाठीच शासनाने उपाय करण्याची मागणीही त्यांनी केली. नोकरांना सुटीचाही पगार मिळतो तसे जनावरांच्या भाकड काळातही वैरण, खाद्य किंवा औषधासाठी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी  सांगितले.