शहरातलगची सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नालवाडी ग्रामपंचायतीचे साहित्य परस्पर विकण्यात आल्याची गंभीर तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच केल्याने ही ग्रामपंचायत पुन्हा चर्चेत आली आहे.
सोन्याचा भाव असलेल्या नालवाडी परिसरातील अवैध भूखंड विक्री व नियमबाह्य़ा सदनिका संकूल सातत्याने चर्चेत राहिलेले आहे. याविषयी प्रचंड ओरड झाल्यावर प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने अवैध बांधकाम थांबविण्याचे निर्देश देतांनाच अवैध सदनिकांची विक्री थांबविली. अपेक्षेपेक्षा जास्त झालेले बांधकाम पाडण्याचे निर्देशही दिले आहे. आता नालवाडी ग्रामपंचायतीच्या गैरकारभारावर या भागाचे पंचायत समिती सदस्य डॉ. बाळकृष्ण माउस्कर, ग्रामपंचायत सदस्य सुशिल पाटील व विवेकानंद चहांदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार बांधकामासाठी पाडण्यात आलेल्या जुन्या इमारतीतील साहित्य परस्पर विकण्यात आले आहे. या पाडलेल्या वास्तूतील सागवानाचे दरवाजे, लोखंडी गज, कवेलू, विटा, अशी लखो रुपयाची मालमत्ता लिलाव न करताच विकण्यात आली आहे.
विविध विकासाची कामे मासिक सभेच्या विषयपत्रिकेवर न घेता सभा आटोपल्यावर प्रोसेडिंगवर घेतली जातात. त्यात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. सरपंच व सचिव अशा कामांचा थांगपत्ता लागू देत नाही. एक लाख रुपयावरील साहित्य खरेदी ई-टेंडरिंगमार्फ त करावी लागते. सूचना फ लकावर विकासकामांची यादी लावणे बंधनकारक आहे. मात्र, तसे न करता सदस्यांना अंधारात ठेवून अशी कामे आटोपली जातात.
२०१०-११ पासून ते आजतागायत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून वीस टक्के रकमेची कामे मागासवर्गीय विकास कल्याण कामासाठी करणे बंधनकारक आहे. मात्र, तसे झालेले नाही. अशा तक्रारीचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती तक्रारकर्त्यांनी दिली आहे.