काँग्रेसमध्ये नाराजीची गुढी

लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचे आणि नवी मुंबई पालिका निवडणूक आली की त्यात काँग्रेसचे संख्याबळ कमी करण्याची भाषा वापरायची असे तंत्र नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस गेली अनेक वर्षे वापरत असल्याने या वर्षी राष्ट्रवादीला सहकार्य न करण्याचा इशारा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.

लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचे आणि नवी मुंबई पालिका निवडणूक आली की त्यात काँग्रेसचे संख्याबळ कमी करण्याची भाषा वापरायची असे तंत्र नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस गेली अनेक वर्षे वापरत असल्याने या वर्षी राष्ट्रवादीला सहकार्य न करण्याचा इशारा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.
ठाण्यात तुम्ही सहकार्य करणार नसाल तर मग पालघरमध्ये आमच्याही पांठिब्याची अपेक्षा ठेवू नका, असा उलट इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. त्यामुळे या दोन्ही काँग्रेसने नाराजीची गुढी उभारल्याचे चित्र आहे. वाशी येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक विजय पाटील यांच्या रेल्वे स्थानकाजवळील फार्महाऊसवर रविवारी नवी मुंबईतील स्थानिक नेते, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. दीडशे प्रमुख कार्यकर्ते या स्नेहभोजनासाठी उपस्थित होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांना अक्षरश: वापरून घेत असल्याचे या वेळी निर्दशनास आणून देण्यात आले. देण्याची वेळ येते तेव्हा राष्ट्रवादी आपले दात दाखवित असल्याची टीका या वेळी कार्यकर्त्यांनी केली.
त्यामुळे या वेळी राष्ट्रवादीला मदत न करता मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे उमेदवार उभा करून नाराजी व्यक्त करण्याचा एक मतप्रवाहदेखील मांडण्यात आला. नवी मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सिडकोचे संचालक नामदेव भगत व माजी पंचायत सदस्य वसंत म्हात्रे यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उभे केले होते.
यात दोघांना दारुण पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळे तो प्रयोग पुन्हा न करण्याचेही मत या वेळी व्यक्त करण्यात आले. निवडणुकीत या वेळी नकारात्मक मत नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. राष्ट्रवादीला मदत करायची नसेल तर नकारात्मक बटण दाबण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना करता येईल, असेही सुचविण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे ठाणे लोकसभा उमेदवार डॉ. संजीव नाईक यांना सहकार्य न करण्याची तयारी नवी मुबंईतील काँग्रेसने केलेली आहे.
हा प्रयोग स्थानिक काँग्रेसने वाशी येथील एका पोटनिवडणुकीत आठवडय़ापूर्वी केलेला आहे, पण त्यात काँग्रेस तोंडावर चांगलीच आपटली. यासाठी काँग्रेसने शिवसेनेचाही छुपा पांठिबा घेतला.  राष्ट्रवादीनेही काँग्रेसच्या या वारावर पलटवार केला असून याच वेळी तुम्ही ठाणे लोकसभा मतदारसंघात मदत करणार नसाल तर काँग्रेसचे उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या पालघर मतदारसंघात काँग्रेसला मदत न करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Conflicts in congress party

ताज्या बातम्या