विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महत्त्वाचा दिवस असूनही दिवसभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयांमध्ये रविवारची सुटी असल्यासारखे वातावरण होते. निवडणुकांच्या निकालाचे कल येणे सुरू झाले, तरी दुपापर्यंत पक्षाचे कुणी नेते इकडे फिरकले नाहीत. परवापर्यंत गजबजलेल्या या कार्यालयांमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयातील उत्साही वातावरणाच्या नेमका उलट असा भयाण शुकशुकाट जाणवत होता.
सकाळी नऊपासून निवडणुकांचा कल स्पष्ट होऊ लागला, तसे निकाल कुणाच्या बाजूने झुकणार याचा अंदाज येऊ लागला. स्वाभाविकच काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही दिसत नव्हते. या पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हळूहळू येऊ लागले. परंतु एरवी कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी आतुर असलेल्यांपैकी कुणीही त्यांना भेटण्यासाठी हजर नव्हता. दुपारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे पराभव मान्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यासाठी आले, त्यावेळी त्यांच्यासोबत चार-दोन नेते आले तेवढेच. पण कार्यकर्ते गायब होते. मात्र या सगळ्यांची देहबोलीच काँग्रेसच्या पराभवाची कहाणी सांगत कार्यालयातील निराशाजनक वातावरणात भर घालत होती. त्याहीवेळी कार्यालयात हजर असलेल्या लोकांपेक्षा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची संख्याच जास्त होती.
शेजारच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तर अक्षरश: सुतकी वातावरण होते. पक्षाचे कुणी नेते येणार आहेत काय, हे सांगण्यासाठीदेखील कुणीही शोधून सापडत नव्हता. फक्त प्रसारमाध्यमांचे तुरळक प्रतिनिधी अधूनमधून ये-जा करत होते. एका वातानुकूलित खोलीत दूरचित्रवाणी संचावर सुरू असलेले निकाल पक्षाच्या समर्थकांच्या निराशेत भर घालणारेच होते. माध्यान्हापर्यंत पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक कार्यालयात पोहचले खरे; परंतु अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही, सगळे निकाल येऊ द्या, नंतरच बोलणे योग्य ठरेल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पक्षाचा एकही कार्यकर्ता कार्यालयाकडे फिरकल्याचे दिसले नाही.
या दोन्ही कार्यालयांबाहेरील उपाहारगृहे बंद ठेवण्यात आली होती. केवळ बंदोबस्तावरील पोलिसांमुळे थोडीफार वर्दळ जाणवत होतील. सुटीच्या दिवसाचे वातावरण दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या कार्यालयातील भयाण शांततेत भर घालणारेच होते.