एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील काँग्रेसच्या प्रवासामध्ये अनेक चढउतार आले. मात्र, ११ जागांवरून गेल्यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या चार जागा असा उतरता क्रम राहिला होता. २००४च्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात ११ पैकी फक्त नागपूरची एकच जागा जिंकता आली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या जागा वाढतात की कायम असलेल्या जागाही जातात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.
१९५७ ते २००४ या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर १९५७, ६७, ७१, ८०, ८४ व १९९८च्या निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील सर्व जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या नावावर कोणालाही उभे केले तरी ते निवडून येत होते, असे विदर्भाबाबत त्यावेळी बोलले जात असे. त्यामुळेच मूळ जम्मू-काश्मीर (गुलामनबी आझाद) आणि आंध्रप्रदेश (पी.व्ही. नरसिंहराव)चे रहिवासी असलेल्यांनाही या भागातील मतदारांनी विजयी केले होते. गांधी घराण्यातील श्रद्धेमुळे उमेदवार गौण ठरत असे. १९९१च्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोला वगळता सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. विरोधकांना फक्त अकोल्याची जागा मिळाली होती. १९९६च्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात फक्त रामटेक (दत्ता मेघे), भंडारा (प्रफुल्ल पटेल) या दोन जागा मिळाल्या. उर्वरित ९ जागांपैकी बुलढाणा, वाशीम, अमरावती सेनेला, तर अकोला, नागपूर, चिमूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळच्या जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. दोनच वर्षांने १९९८मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसने विदर्भ बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. सर्वच्या सर्व ११ जागा काँग्रेस व त्यांचा मित्र पक्ष रिपाइंच्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या. आंबेडकर, गवई आणि कवाडे हे रिपाइंचे उमेदवार अनुक्रमे अकोला, अमरावती आणि चिमूर येथून विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर एकाच वर्षांने म्हणजे १९९९च्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा झटका बसला. ११ पैकी केवळ नागपूर (विलास मुत्तेमवार), चंद्रपूर (नरेश पुगलिया) आणि वर्धा (प्रभा राव), यवतमाळ (उत्तमराव पाटील) या चार जागा जिंकता आल्या. २००४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील ११ पैकी फक्त नागपूरची जागा जिंकली. जागांप्रमाणे काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्येही कधी वाढ तर कधी घट झाल्याचे दिसून येते. २००९च्या निवडणुकीत काँग्रेसला चार, राष्ट्रवादीला एक आणि युतीला पाच जागा मिळाल्या होत्या. त्यात नागपूर, रामटेक, गडचिरोली, वर्धा या जागेवर काँग्रेसने तर भंडारा-गोंदिया जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. तर भाजप- शिवसेना युतीला बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ या पाच जागा मिळाल्या होत्या. यावेळी विदर्भात अकोला, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणचे उमेदवार बदलले आहेत. त्यामुळे नवे उमेदवार जागा शाबूत ठेवतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असून ही काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. १९५७ मध्ये काँग्रेसने ५७ टक्के (११ जागा), १९६२ मध्ये ४२.२ टक्के (९), १९६७ मध्ये ४७.१ टक्के (१०), १९७१ मध्ये ६७ टक्के (१० ), १९७७ मध्ये ५०.५ टक्के (८ ), १९८० मध्ये ६१.०५ टक्के (११), १९८४च्या निवडणुकीत ५०.६ टक्के मते घेऊन काँग्रेसने सर्व जागा राखल्या. कधी सर्वच जागांवर विजय तर कधी फक्त एकावर समाधान, असे काँग्रेसचे चित्र या भागात आहे. यावरून विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता राहील की नाही, असे बोलले जात आहे.