राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाल्यामुळे काँग्रेसने सिडकोसारख्या श्रीमंत महामंडळाचे दोन वेळा संचालक पद, पराजित झालेले असताना स्वीकृत नगरसेवक, विधानसभेची उमेदवारी, दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत केलेल्या बंडखोरीनंतरही पक्षाने कारवाई न करण्याच्या दाखविलेल्या सौजन्याला मूठमाती देऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष नामदेव भगत यांनी शुक्रवारी काँग्रेसला अखेरचा रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला. नवी मुंबई हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. नवी मुंबईतील २९ गावांमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने दिवंगत जर्नादन गौरी दोन वेळा आमदार झाले. सप्टेंबर १९९० मध्ये गणेश नाईक बेलापूरचे पहिले आमदार झाले आणि काँग्रेसची सद्दी संपण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पालिकेतील विरोधी पक्षनेते पदाने देखील नंतर काँग्रेसला हुलकावणी दिली. आपापसांतील मतभेद, पक्ष वाढविण्याची नसलेली इच्छाशक्ती आणि कणखर नेतृत्वाचा अभाव यामुळे काँग्रेस पुरती रसातळाला गेल्याचे दिसून येते. या संघर्षांत नेरुळच्या नामदेव भगत यांनी काँग्रेस टिकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भगत म्हणजे काँग्रेस असे शहरात समीकरण तयार झाले होते. काँग्रेसनेही त्यांना अनेक मानाची पदे देऊन स्वातंत्र्य दिले होते. काँग्रेसचे आता काही खरे नाही असे लक्षात येताच पालिका निवडणुकीच्या तोंडावर भगत यांनी आपली भक्ती मातोश्रीचरणी वाहिली आहे. शिवसेनेत जाऊन सिडकोचे संचालक पद पुन्हा पदरात पाडून घेण्याचा भगत प्रयत्न करणार असल्याचे दिसून येते.