ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने आखलेल्या समूह विकास योजनेचा (क्लस्टर) निवडणुकीच्या रणधुमाळीत फायदा करून घेण्याची रणनीती काँग्रेस उमेदवारांनी आखली असून पक्षाच्या वतीने गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात क्लस्टरच्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा आणि ठाणे शहर अशा तिन्ही मतदारसंघांत धोकादायक इमारतींचा प्रश्न जटिल बनला आहे. काँग्रेसच्या काळात ही योजना मंजूर झाल्याचा मुद्दा स्थानिक उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडला असून क्लस्टरच्या अंमलबजावणीचे आश्वासनही पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाल्याने स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे शहरांतील उमेदवारांनी ‘काँग्रेसचा हात म्हणजेच विकासाला साथ’ असा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने झोपडपट्टी मुक्त ठाणे शहराचे आश्वासन दिले आहेत. काँग्रेस पक्षाचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार मोहन गोस्वामी (तिवारी) आणि ठाणे शहर मतदारसंघातील उमेदवार नारायण पवार या दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी टिपटॉप प्लाझा येथे स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले. ठाणे शहरातील पक्षाचे उमेदवार नारायण पवार यांच्या जाहीरनाम्यात शहरातील वाहतूकव्यवस्था, सॅटिस पुलाची लांबी वाढविणे, पर्यटन केंद्रांची उभारणी, प्राणिसंग्रहालय उभारणे अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सन २००० पर्यंतच्या झोपडपट्टय़ांना कायदेशीर संरक्षण देण्याचा मुद्दा अद्याप कागदावर असला तरी समूह विकास योजनेत सहभाही होणाऱ्या मार्च २०१४ पर्यंतच्या झोपडय़ांना अप्रत्यक्ष संरक्षण देण्याचा मुद्दा क्लस्टर योजनेच्या आराखडय़ात समाविष्ट करून घेण्यात आला आहे. नेमका हाच मुद्दा हेरून झोपडपट्टी मुक्त ठाणे शहराचे आश्वासन पक्षाने दिले आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टी असून येथील मतदारांसाठी क्लस्टर योजना महत्त्वाची आहे. मात्र, ही योजना अजूनही शासनाच्या दरबारात अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. असे असतानाही तिवारी यांनी या मतदारांना आकर्षित करण्यासाठी या मतदारसंघातील उमेदवार मोहन तिवारी यांनी जाहीरनाम्यात चक्क ही योजना मंजूर झाल्याचा दावा केला आहे.