महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीने २००५ मध्ये संविधान चौक ते दीक्षाभूमी अशी संविधान मिरवणूक काढण्यात आली. यात अधिकारी, कर्मचारी आणि वेगवेगळ्या समाजिक संघटनांचे पाच ते सहा हजार सदस्य सहभागी झाले होते. देशात अशाप्रकारची ही पहिलीच मिरवणूक होती. त्यावेळी संविधान दिवस साजरा करण्याचा विषय आला आणि त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर २००८ शासनाने यासंदर्भात परित्रक काढले. तेव्हापासून शासकीय पातळीवर आणि विविध सामाजिक संघटनांकडून २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे, असे सांगून संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी संविधान दिन निश्चितीची पाश्र्वभूमी विशद केली. राज्यघटनेत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता वाढीस लावण्याचा संकल्प आहे. परंतु महाराष्ट्र सोडला तर देशातील कोणत्याही राज्यात विद्यार्थ्यांना, जनतेला संविधानाची ओळख करून देणारी यंत्रणा नाही. देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अर्पण करण्यात आले. त्यामुळे हा दिवस देशपातळीवर साजरा होण्याची आवश्यकता आहे. भारतीय संविधानाची प्रास्ताविका हा संविधानाचा आत्मा आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेसमोर म्हटले होते. संविधान हे प्रत्येकाला भारतीयत्वाची आठवण करून देते. मी जिल्हा परिषेदत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना २००५मध्ये नागपूर जिल्ह्य़ातील शाळेतून ‘संविधान प्रस्ताविके’चे दररोज वाचन प्रार्थनेच्यावेळी सुरू करण्यात आले. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने शालेय पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रास्ताविका छापण्यात आली. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी निर्णय घेऊन २४ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक कार्यालयात २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले, असेही ते म्हणाले. संविधान दिन राष्ट्रीय पातळीवर साजरा व्हावा, या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० जूनला आणि ३ ऑक्टोबरला पत्र लिहिले आहे. देशात संविधान संस्कृती निर्माण होणे अत्यंत गरजेच आहे. त्याशिवाय लोकशाहीची पाळेमुळे देशात खोलवर रूजणार नाही, असेही ते म्हणाले. विविध स्पर्धाचे आयोजनसंविधानाबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून शाळा-महाविद्यालयांना पत्र लिहिले आहे. घोषवाक्य, निबंध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ३१ डिसेंबपर्यंत प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. संविधानाच्या प्रास्ताविकेची रिंगटोनराजेश बुरबुरे यांच्या आवाजात संविधान प्रास्ताविकेची रिंगटोन उपलब्ध आहे. या गीताला संगीत प्रभाकर धाकडे आणि भूपेश सवई यांनी दिले आहे.आर.बी.आय. चौकाचे झाले संविधान चौक : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी निगडीत कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नागरिक आर.बी.आय. चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जमतात. यामुळे या चौकाला ‘संविधान चौक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर या चौकाला त्यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली. परंतु या चौकात बाबासाहेबांचा पुतळा आहे. देशातील मध्यवर्ती बँकेची इमारत आहे. शेजारी विधानभवन आणि कस्तुरचंद पार्क आहे. शिवाय या चौकाला संविधान चौक असे नाव देण्याची जुनी मागणी असल्याने महापालिका आणि प्रशासकीय पातळीवर संविधान फाऊंडेशन आणि इतर संघटनांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेने तत्त्वत मान्यता दिली होती. परंतु सर्वसाधारण सभा घेऊन त्यावर शिक्कामोर्तब व्हायचा होता. आंबेडकरी संघटनांनी २५ नोव्हेंबर २०१२ च्या मध्यरात्री या चौकात संविधान चौक लिहिलेला फलक लावला. त्यानंतर रिसतर महापालिकेने ठराव केला. मात्र अद्याप संविधान चौकात प्रास्तविका लावण्यात आलेली नाही.