आघाडी आणि युतीचा जागा वाटपाच्या घोळात दोन्ही बाजूंकडून इच्छूक उमेदवार व्दिधा मनस्थितीत सापडले असताना शहरासह जिल्ह्यात इतर पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यात काही पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले नसतानाही इच्छुकांनी प्रचारास सुरूवात केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रचारासाठी महिन्यापेक्षा कमी कालावधी मिळणार असल्याचा धोका लक्षात घेत काही इच्छुकांनी उघडपणे तर, काहींनी छुप्या मार्गाने प्रचारास सुरूवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीची अधीसूचना जाहीर झाल्यानंतरही भाजप-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपावरून एकमेकांची ताकद आजमिण्याचे जे प्रयत्न सुरू झाले त्यात जिल्ह्यातील ज्या इच्छुकांना विजयाची अधिक खात्री आहे ते चांगलेच धास्तावले आहेत. पक्षाकडून त्यांना उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात आले असले तरी मुळात युती किंवा आघाडी होईल किंवा नाही हेच निश्चित नसताना उघडपणे प्रचार तरी कसा करणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. दोन्ही बाजूंमधील वाद जितक्या लवकर मिटेल त्याप्रमाणे प्रचाराचे गणित आखता येईल असा इच्छुकांचा अंदाज आहे. तर, युती आणि आघाडीतील वादाशी काहीही देणेघेणे नसलेल्या इच्छुकांनी प्रचारास सुरूवातही केली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात डावी लोकशाही आघाडीचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड यांनी कामगारवर्गाच्या बळावर प्रचारास सुरूवात केली आहे. तर, मनसेचे विद्यमान आमदार नितीन भोसले यांनीही प्रचार फेरी काढून आपली उमेदवारी निश्चित असल्याची ग्वाही दिली. मनसेचे शहरात तीन आमदार असून भोसले त्यापैकी एक आहेत. प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गिते पुन्हा एकदा नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी करण्याची चिन्हे आहेत. नाशिक पूर्व मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आ. उत्तमराव ढिकले यांनी उमेदवारी करण्यास नकार दिल्याने या मतदारसंघात मनसेकडून नवीन उमेदवार पाहावयास मिळू शकतो.
याव्यतिरिक्त नाशिक मध्य मतदारसंघातून काँग्रेसचे शाहु खैरे आणि शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी छुप्या पध्दतीने प्रचार सुरू ठेवला आहे. खैरे यांनी आपल्या उमेदवारीच्या पत्रकांचे वाटप केले असले तरी त्यात पक्षाचा किेंवा चिन्हाचा उल्लेख नसल्याने त्यांचे समर्थकही संभ्रमित आहेत. नाशिकमध्ये ही स्थिती असताना ग्रामीण भागात अनेक इच्छूक उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार सुरू ठेवला आहे. येवला मतदारसंघात शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसताना संभाजी पवार आणि कल्याणराव पाटील या दोघा इच्छुकांनी गावोगावी मान्यवरांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. असाच प्रकार नांदगाव मतदारसंघात सुरू आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छूक असलेले सुहास कांदे, भाजपचे अव्दय हिरे यांच्याकडून आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचे बिंबविले जात आहे. या सर्व प्रकारांमुळे उमेदवारीसाठी ज्यांनी वरिष्ठ नेत्यांची गाठभेट घेतली आहे, अशी युती आणि आघाडीकडील मंडळी पुरती गोंधळली आहे. युती किंवा आघाडीसंदर्भात एकदाचा निर्णय त्वरीत घेऊन उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याची मागणी इच्छुकांकडून होत आहे.