* महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली
* मैदानात झोपडय़ांचे अतिक्रमण
* बांधकाम साहित्याच्या ढिगामुळे नागरिक हैराण
* रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात
शहराची फुफ्फुसे समजल्या जाणाऱ्या मोकळ्या मैदानांची ठाणे शहरात आधीच वानवा असताना घोडबंदर रोड येथील कावेसर परिसरातील एक विस्तीर्ण मैदान सध्या महापालिकेच्या ठेकेदारानेच गिळले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. या भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने संबंधित ठेकेदारास हे मैदान भाडेतत्त्वावर दिले आहे. असे असताना ठेकेदाराने या मैदानाचा वापर कामगारांच्या झोपडय़ा बांधणे, बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी सुरू केल्याने मोकळे मैदान अतिक्रमित बनले आहे. यामुळे या परिसरातील मुलांचे हक्काचे मैदान बळकावले गेल्याची भावना येथील रहिवाशांमध्ये निर्माण झाली असून महापालिकेनेही संबंधित ठेकेदारास नोटीस बजावूनही अद्याप मैदान रिकामे झाले नसल्याचे चित्र येथे दिसत आहे.
घोडबंदर रोड येथील कावेसर परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वस्तिक रेसिडेन्सी गृहसंकुलासमोरील खेळाचे मैदान महापालिकेच्या वतीने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरला एप्रिल २०१३ पर्यंत भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. हे मैदान भाडय़ावर देताना फक्त दोन केबिन बांधण्याची परवानगी महापालिकेतर्फे देण्यात आली होती. परंतु महापालिकेच्या परवानगीला धाब्यावर बसवत ठेकेदाराने मैदानात मजुरांसाठी चक्क झोपडय़ा बांधल्या आहेत. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने मजूर वास्तव्य करू लागले असून यामुळे हे मैदान खेळण्यासाठी शिल्लकच राहिलेले नाही. या ठिकाणी राहाणारे मजूर उघडय़ावरच नैसर्गिक विधी करत असतात. यामुळे आसपासच्या इमारतीत राहणारे रहिवासी हैराण झाले आहेत. येथे मजुरांच्या झोपडय़ांना वीजपुरवठा करण्यासाठी अनधिकृतपणे जनरेटरची उभारणी करण्यात आल्याची तक्रार घोडबंदर रोड वेल्फेअर असोसिएशनने महापालिकेकडे केली आहे. याशिवाय सायंकाळी डांबर वितळविण्याचे बॉयलर, खडी तसेच माती वाहणारे ट्रक, रोलर, पोकलेन मशिन आणि चारचाकी गाडय़ा मैदानातच उभ्या केल्या जातात. अशा प्रकारे वाहने उभी करण्याची परवानगी ठेकेदाराला नाही, तर अजस्र अशी वाहने मैदानात उभी करून मैदान खराब करण्याचे काम या ठिकाणी होत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. यामुळे परिसरातील मुलांना मैदानावर खेळण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. रात्रीच्या वेळी येथील मजुरांचा याच मैदानावर मद्यपानाचा कार्यक्रम चालू असतो. यावेळी होणारी त्यांची भांडणे तसेच बाचाबाची यामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. सकाळच्या वेळी मैदानातच डांबर वितळविण्याचे काम सुरू असते. हे मैदान तिन्ही बाजूंनी रहिवासी इमारतींनी वेढलेले आहे. डांबर वितळवाना या भागात मोठा असा आवाज होतो. याशिवाय मोठय़ा प्रमाणावर काळ्या धुराची निर्मिती होत असते. हा सर्व धूर आसपासच्या परिसरात असल्याने सकाळच्या वेळेतच येथे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. हे मैदान ठेकेदारास भाडय़ावर देण्याआधी येथे मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असे. परंतु मागील काही महिन्यांपासून येथे एकही कार्यक्रम झालेला नाही. वापरात नसलेले बांधकाम साहित्यदेखील मैदानावर टाकण्यात आले आहे. मैदानावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने सुप्रीम इन्फास्ट्रक्चरला महापालिकेच्या वतीने नोटीसही बजावली आहे. परंतु ठेकेदाराकडून महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्याचे दिसत आहे. स्थानिक राजकीय पाठबळामुळे या ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून केला जात आहे. ‘घोडबंदर रोड हौसिंग फेडरेशन’च्या वतीने या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर वरील सर्व प्रकार उघडकीस आला आहे. आता या सर्व प्रकारावर महापालिका प्रशासन काय कारवाई करते याच्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.