सायन-पनवेल महामार्गावर एकीकडे टोलवसुलीची घाई केली जात असताना कामोठे येथील दुहेरी मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आलेले आहे. पहिल्यांदा अर्धवट रस्त्यांचे पूर्ण काम करा, नंतरच टोलनाके उभारा, अशी भावना येथील प्रवाशांची आहे. कामोठे वसाहतीमधून सायन-पनवेल मार्गावर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट ठेवल्याने हा रस्ता कंत्राटदाराच्या प्रतीक्षेत असल्याचे येथून जाणारे प्रवासी बोलतात.
सायन-पनवेल मार्ग खारघर येथील टोलनाक्यामुळे प्रसिद्धीस आला. या मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर झाले. मात्र कामोठे वसाहतीच्या प्रवेशद्वाराचा मार्ग अडगळीचा बनला आहे. कामोठे वसाहतीमध्ये शिरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतो. गेल्या दीड महिन्यापासून या मार्गाचे काम ठप्प आहे. या मार्गाचे काम करणारे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने हे काम बंद होते, असा समज सामान्यांचा होता. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही कामाला सुरुवात होत नसल्याने कामोठेकरांचा प्रवास खडतर बनला आहे.